भिवंडीकरांनी अर्थसंकल्पाइतका थकवला पालिकेचा मालमत्ता कर

नियोजनाअभावी दंड व्याजासह एक हजार कोटींची वसुली करण्यात प्रशासनाला अपयश

भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची २०२६ पर्यंत ९९४.३० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी आहे. त्यामध्ये ४१८ कोटी रुपये दंड व्याजाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही थकबाकी महापालिकेच्या मागील बजेटएवढी झाली आहे.

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी सांगितले की, कर वसुलीत नागरिकांचा कमी प्रतिसाद असून त्यामुळे होणारी कमी वसुली ही दीर्घकाळापासून महापालिकेसाठी एक मोठी समस्या आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत फक्त २९.९६ कोटी जमा झाले. यामध्ये चालू वर्षाच्या मालमत्ता करातील १६ कोटी आणि जुन्या करातील १३ कोटींचा समावेश आहे. त्यांनी स्पष्ट केले की, महापालिका थकित मालमत्ता कर वसूल करण्यासाठी वारंवार अभय योजना जाहीर करते. त्या अंतर्गत मालमत्ताधारकांना १००टक्के व्याजाची सवलत दिली जाते. या जाहीर योजनेनंतरही थकित रक्कम न भरल्यास मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मालमत्ता कर विभागाचे प्रमुख सुधीर गुरव यांनी सांगितले की, वसुलीची प्रक्रिया जलद करण्यासाठी महापालिकेच्या पाचही प्रभाग समित्यांमध्ये ८० हून अधिक लिपिकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर दोन ८५,१७१ मालमत्ता धारकांकडून थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.

मालमत्ता कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून कर वसुलीत अपेक्षित वाढ न झाल्याने परिसरातील विकास प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. व्याजमाफी योजनांची वाट पाहत असताना मोठ्या संख्येने लोक त्यांचे कर भरणे पुढे ढकलत आहेत. महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे की, ही योजना मर्यादित कालावधीसाठी आहे. ३१ मार्च २०२६ नंतर थकबाकीदारांना व्याजदरात कोणतीही सूट दिली जाणार नाही. महापालिकेच्या प्रशासकीय काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही. काही अधिकारी व वसुली कर्मचारी यांनी माजी नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून अपेक्षित वसुली केली नाही. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांवर वेळीच कारवाई न करता त्यांना अभय दिल्याने वसुलीचा प्रतिसाद कमी झाला आहे. तर केवळ वसुलीचे आकडे फुगविण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करीत जानेवारी ते मार्च या काळात अभय योजना अंतर्गत त्यांच्याकडून वसुली केली जाते. मात्र वर्षभर थकबाकीदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी थकबाकीमध्ये वाढ होऊन यावर्षी या थकबाकीने पालिकेच्या अर्थसंकल्पाइतका आकडा गाठला आहे.

प्रभागनिहाय मालमत्तांची आकडेवारी

प्रभाग निवासी व्यावसायिक एकूण
१ ६९,८६३ ९,५९८ ७९,४६१
२ ५२,२९८ ८,०७३ ६०,३७१
३ ५९,७७६ ७,५५९ ६७,३३५
४ ३२,७७६ ८,२४३ ४१,०१९
५ ३०,७२० ६,२६५ ३६,९८५

प्रभाग समितीनुसार थकबाकी (कोटींमध्ये)

विभाग मागील चालू एकूण

१ २९६.९४ ५१.९५ ३४८.८९
२. १६१.६५ ३३.८१ १९५.४६
३. १४१.०३ ३५.४९ १७६.५२
४. १२४.१७ ३४.०८ १५८.२५
५. ९४.७७ २०.४१ १५.१८