अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या तीन हजार वृक्षांवर पडणार कुऱ्हाड

पालिकेने मागविल्या हरकती-सूचना

ठाणे : एकीकडे सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करताना वृक्षांची कत्तल करण्यात आली असतानाच अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या सुमारे तीन हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जाहीर सूचना ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने प्रसिद्ध केली आहे.

वर्तुळाकार मेट्रो २०२९ पर्यंत ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल. प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी असून, २६ किमी उन्नत व तीन किलोमीटर भूमिगत मार्ग असेल. दरम्यान, प्रकल्पामुळे  फॉक्सटेल पामसह जांभूळ, सप्तपर्णी, बदाम, कडंब, सोनमोहर, पिंपळ, गुलमोहर, करंज, आंबा, शेवगा, नारळ, पेरू, वड, काळा उंबर, रामफळ, आदींसह देशी व विदेशी प्रजातींच्या झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे.

रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्यनगर बसडेपो, शिवाजीनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकूम नाका, बाळकूमपाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे अशी स्थानकांची आखणी केली आहे. शहरातील १३२ इमारतींच्या खालून ही मेट्रो जाईल.

पालिकेने हरकती, सूचना मागविल्या असून ३,२२४ वृक्ष बाधित होतील. २,६९३ वृक्षांचे पुनर्रोपण होईल. यात उपवन तलावाजवळची वृक्षसंपदा नष्ट होणार आहे. वागळे इस्टेट सर्कल, रायलादेवी, लोकमान्य, शिवाईनगर  या भागातील वृक्षांचा त्यात समावेश आहे.