* टीएमटीच्या २४० डिझेल गाड्यांचे आयुष्य पाच वर्षांनी वाढणार
* २० कोटी खर्चाचा प्रकल्प
* नवीन बसगाड्यांचा शेकडो कोटींचा खर्च तूर्त वाचणार
ठाणे: भंगाराच्या दिशेने जाणार्या तब्बल २४० डिझेल बसगाड्यांचे सीएनजीत रुपांतर करण्याचा महत्वाचा निर्णय ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेने घेतला आहे. सुमारे २० कोटी रुपयांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या बसगाड्यांची कालमर्यादा आणखी पाच वर्षे वाढणार आहे. या निर्णयामुळे नव्या बस खरेदीवरील शेकडो कोटींचा खर्च टळणार असून प्रदूषणातही घट होणार आहे.
सध्या टीएमटीकडे सुमारे ४०० ते ४५० बस आहेत. ठाणे शहराच्या विविध मार्गावरून या बस धावत आहेत. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेचा डोलारा डगमगला आहे. आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही ठाणेकरांना स्वस्त आणि जलद प्रवास देण्यासाठी टीएमटीकडून नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत ३०३ नवीन ई-बसेस घेण्याचे नियोजन आहे. सध्या ताफ्यात सुमारे १२३ ई-बसेस कार्यरत आहेत. शंभर सीएनजी बसेसही ताफ्यात येणार आहेत.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६० आसन क्षमता असलेल्या नवीन डबल डेकर बस सुरू करण्याचे नियोजन आहे. असे असले तरी दुसरीकडे टीएमटीच्या ताफ्यातील २४० डिझेल बसची १० वर्षांची वयोमर्यादा येत्या ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. नियमानुसार त्यानंतर या बसेस सेवेतून बाद कराव्या लागणार आहेत. नवीन योजनेतील बस येण्यास आणखी कालावधी लागणार आहे. आधीच आहे त्या बसेसची सेवा अपुरी पडत असताना २४० बसेस भंगारात काढणे टीएमटीला परवडणारे नाही. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने या बसेस भंगारात काढण्याऐवजी त्यांचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या रूपांतरानंतर संबंधित बसेसची वयोमर्यादा आणखी पाच वर्षांनी वाढणार असून प्रवाशांची सेवा पूर्ववत ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती परिवहन सेवेचे अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला प्रति बस सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) यांच्यासोबत केलेल्या वाटाघाटीतून प्रति बस सुमारे दोन लाख ७० हजार रुपयांची सूट मिळविण्यात यश आले. त्यामुळे प्रति बस खर्च सुमारे साडेसात ते आठ लाख रुपयांपर्यंत खाली आला. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात सुमारे सहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
टीएमटीची आर्थिक स्थिती सध्या बेताची असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन बसेस खरेदी करणे महापालिकेसाठी कठीण होते. अशा परिस्थितीत विद्यमान बसेसचे सीएनजीमध्ये रूपांतर हा पर्याय प्रशासनाने निवडला. यामुळे इंधन खर्चातही लक्षणीय बचत होण्याची शक्यता आहे.
डिझेलच्या तुलनेत सीएनजी इंधन कमी खर्चिक कमी प्रदूषणकारक असल्याने शहरातील वायू प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे तसेच आर्थिक बचत देखिल होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच नियमित बससेवा उपलब्ध राहणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर होणारा परिणामही टळणार आहे.