लेखक दीपक करंजीकर यांनी ओघवत्या शैलीत मांडली भू-राजकीय प्रतलाची मांडणी
ठाणे: आखातातील तेल पुरवठ्यावर ताबा मिळवणे पर्यायाने डॉलरच्या माध्यमातून अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि इराणला खिळखिळा करताना मित्र राष्ट्र इस्रायलला मजबूत करणे हा उद्देश सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या मागे असला तरी पुढील ५०० वर्षांनंतर इस्लाम राष्ट्रे कुठे असतील हे पाहण्यासाठी अमेरिकेने युद्धाच्या माध्यमातून केलेली ही लिटमस पेपर चाचणी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते, लेखक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक करंजीकर यांनी व्यक्त केले.
‘ठाणेवैभव’कार नरेंद्र बल्लाळ यांच्या ३२व्या स्मृतिदिनी म्हणजे ६ मार्च रोजी आयोजित नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमालेत दीपक करंजीकर बोलत होते. २१व्या शतकाचे भू राजकीय प्रतल आणि भारत या विषयावर त्यांनी ओघवत्या शैलीत सध्या सुरू असलेले युद्ध, त्यामागील कारणे, वर्चस्वासाठी सुरू असलेल्या विविधांगी स्पर्धा आणि त्यातील भारताचे स्थान यांची सोदाहरण मांडणी करत श्रोत्यांना दीड तास खिळवून ठेवले.
श्री.करंजीकर यांनी २१व्या शतकाची मांडणी करताना मागील काही शतकांची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले, २१व्या शतकाची पायाभरणी ही मागील शतकात झाली आणि मागच्या शतकावर अमेरिकेचे वर्चस्व होते. त्या आधी दोन शतकांपूर्वी ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल आणि नेदरलँड या पाच प्रमुख राष्ट्रांनी जगभर वसाहती स्थापन करून प्रचंड लूट केली. केवळ लूट केली नाही तर त्या त्या देशांना स्वातंत्र्य देताना पाचर मारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. भारताला स्वातंत्र्य फाळणी करून दिले, त्यावेळी ते दुर्बल झाले होते. दुसरीकडे १८९३मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आखण्यात आलेल्या ड्युरंड लाईनच्या आधारे आजही दक्षिण आशियाचे साम्राज्यवादी राजकारण सुरू असल्याचे श्री.करंजीकर म्हणाले.
रशियन राज्यक्रांतीमागे जनतेचा आक्रोश असला तरी झारची सत्ता उलथवून लावण्यासाठी लेनिन आणि ट्रॉट्स्की यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यावेळच्या महासत्तेने रसद पुरवली होती. आजही आशिया खंडात हा प्रकार सुरू असल्याचे करंजीकर म्हणाले. भारताला स्वातंत्र्य देण्यात आले त्यावेळी चर्चिलने भारतीय नेत्यांबाबत आणि भारताबाबत अपमानास्पद विधाने केली. पण चर्चिल थडग्यात असून भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. भारताला ब्रिटनने स्वातंत्र्य दिले, पण त्याला खंडित करणाऱ्या रेषाही त्यांनी जाता-जाता मारल्या. तरीही भारतात आजही लोकशाही टिकून आहे आणि हे जगातील एकमेव आश्चर्य असल्याचे ते म्हणाले.
१९७९पासून अमेरिकेच्या खांद्यावर बसून चीन मोठा झाला. तंत्रज्ञानापासून सर्वच क्षेत्रातील ज्ञान त्यांनी अमेरिकेकडून घेतले. केवळ कॉपी पेस्ट करून देश घडवता येतो हे चीनने दाखवून दिले. दुसरीकडे रशियातील युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकिस्तानसह पाच भाग तुटले आणि रशिया एकसंघ राहिला नाही. त्यामुळे या शतकात कोणती साम्राज्ये मोठी होतील असे विचारले गेले तर जगावर प्रभाव टाकणारा बिंदू आता पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असल्याचे दिसून येईल. चीनकडे पुरवठा साखळी मोठी आहे भारत पुरवठा साखळीचा विकास करण्याच्या प्रक्रियेत आहे. पुढील काळात अमेरिकेची क्रयशक्ती घटत जाणार असून पुढील काळात चीन ही जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असून भारताने दुसऱ्या स्थानी झेप घेतलेली असेल, असा विश्वास करंजीकर यांनी व्यक्त केला.
गेली अनेक वर्षे अमेरिका युद्धच करत आहे, त्या माध्यमातून त्यांनी सुमारे ३२ देशांचे नकाशे बदलले. तर त्याचवेळी युद्ध न करता चीन पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या प्रक्रियेत मग्न आहे. असे असले तरी अमेरिकेत दाखवण्यापुरती लोकशाही आहे तर चीनमध्ये दाखवण्यापुरती कम्युनिझम आहे. या दोन शक्तींच्या मध्ये इतर देश लोंबकळत असले तरी भारत अबाधित दिसत आहे, कारण भारतात सिव्हिलायजेशन आहे. अमेरिका ही वसाहत आहे. त्यांची राज्यघटना वर तयार होते आणि खाली झिरपते, पण भारताची घटना ही खालून वर जाते. जगातील अनेक प्राचीन संस्कृती लयास गेल्या, पण भारतीय संस्कृती अबाधित असल्याचे करंजीकर यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेली युद्धे आणि आपत्ती यात लाखो नागरिक मृत्यू पावत असल्याचे दाखले देताना करंजीकर म्हणतात, बिल गेट्स आणि रॉक फेलर यांचे भाष्य वाचनात आले. जगात डी-पॉप्युलेशन अजेंडा राबवण्यात येत आहे. २०५० साली जगाची लोकसंख्या १० ते १२ अब्ज होणार असेल तर ती संख्या सहा सात अब्जापुढे जाऊ नये यासाठी मनसे मारण्याच्या व्यवस्था राबविल्या जात नाहीत ना…