मुंबई: फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये सुरू असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शालेय कला, लोककला व चित्रकला या विषयांशी संबंधित प्रस्ताव शाळांकडून विभागीय मंडळांकडे सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ही मुदत ७ ते ९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या एसएससी परीक्षेसाठी शालेय कला, लोककला व चित्रकला या विषयांचे प्रस्ताव संबंधित शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या सूचनेनुसार हे प्रस्ताव २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याची अंतिम मुदत होती. मात्र काही शाळांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी विभागीय मंडळाकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षण मंडळाने शाळांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी संधी देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाळांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ७ ते ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. या मुदतवाढ निर्णयानुसार संबंधित शाळांनी आपले प्रस्ताव विभागीय मंडळांकडे ७ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना मंडळाकडून करण्यात आली आहे.