आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीनंतर अवाजवी दंड माफ
ठाणे: मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून ठोठावलेला लाखोंचा दंड डिग्री कॉलेजने २७ विद्यार्थ्यांच्या माथी मारला होता. या विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन दिलासा देण्याची विनंती केली होती. श्री.केळकर यांनी विद्यापीठाच्या उप कुलगुरूंना भेटून या विद्यार्थ्यांची न्याय बाजू मांडली. अखेर या विद्यार्थ्यांना फक्त पाच हजार रुपये विलंब शुल्क करून त्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने २७ विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
विद्यापीठाच्या नियमानुसार २१ ते ४० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास दहा लाख रुपये दंड अधिक प्रती विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात येते. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून २५ टक्के इतकी कपात करून चौकशी समिती गठित करावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावा. याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेस पाठवले आहे. मात्र संस्थेने विद्यापीठाची प्रवेशाची लिंक बंद-चालू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विलंब झाला असे सांगून हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी श्री.केळकर यांना साकडे घातले होते.
आमदार संजय केळकर यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री.भांबरे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय निदर्शनास आणून दिला. या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास नकार देण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. याबाबत महाविद्यालय प्रशासनाला समज देऊन विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी वैयक्तिक लक्ष घालून असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे म्हणणे उप कुलगुरू यांच्यासमोर मांडले होते.
अखेर या विद्यार्थ्यांना फक्त पाच हजार रुपये विलंब शुल्क भरून परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली. न्याय मिळाल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत.