आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीला यश
ठाणे: येथील कासारवडवली भागात असलेल्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभर शिक्षण घेतले, पण विद्यापीठाची मान्यता नसल्याचे त्यांना माहितच नव्हते. ज्यावेळी परीक्षेला बसण्याची वेळ आली त्यावेळी मान्यतेसाठी आवश्यक परिपूर्तता संबंधीत कॉलेजने विद्यापीठाकडे केली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले होते. त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतल्यानंतर श्री.केळकर यांनी त्वरित उप कुलगुरूंची भेट घेतली. विद्यापीठाने याची तत्काळ दखल घेत समितीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना मान्यता दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता आल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले.
मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला २७ विद्यार्थ्यांच्या विलंबित प्रवेशाच्या कारणावरून संस्थेच्या डिग्री कॉलेजला लाखो रुपयांचा दंड आकारला होता. परीक्षेच्या तोंडावर ही बाब उघडकीस आल्याने सर्वसामान्य पालक हवालदिल झाले होते. या विद्यार्थ्यांनी भाजपचे सुरज दळवी यांच्या माध्यमातून जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
विद्यापीठाच्या नियमानुसार २१ ते ४० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास दहा लाख रुपये दंड अधिक प्रती विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात येते. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून २५ टक्के इतकी कपात करून चौकशी समिती गठित करावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावा. याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेस पाठवले आहे. मात्र संस्थेने विद्यापीठाची प्रवेशाची लिंक बंद-चालू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विलंब झाला असे सांगितले. हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांनी भरल्याशिवाय त्यांचा प्रवेश कायदेशीर ठरणार नव्हता. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी श्री.केळकर यांना साकडे घातले होते.
आमदार संजय केळकर यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री.भांबरे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय निदर्शनास आणून दिला. या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास नकार देण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. याबाबत महाविद्यालय प्रशासनाला समज देऊन विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी वैयक्तिक लक्ष घालू असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे म्हणणे उप कुलगुरू यांच्यासमोर मांडले होते.
अखेर या विद्यार्थ्यांना फक्त पाच हजार रुपये विलंब शुल्क भरून परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत.