ठाणे: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मार्च ते मे महिन्यात दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशातील अन्य भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याची प्रचिती ठाणेकरांना येत असून १ मार्चपासूनच उष्णतेचा पारा चढत असून आज बुधवारी दुपारी ३ वाजता कमाल तापमान ४० अंश एवढे नोंदवले गेले. त्यामुळे दुपारी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मार्च ते मे या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले असून, पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात मार्च ते मे दरम्यान दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशाचे अन्य भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण, किमान तापमान मात्र सरासरी इतके राहण्याची शक्यता व्यक्त आहे.
ठाण्यात १ मार्चपासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. याबाबत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कमाल ३३ अंश सेल्सिअस तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २ मार्चला कमाल ३४ अंश सेल्सिअस तर किमान २२ अंश सेल्सिअस, ३ मार्चला कमाल ३८ अंश सेल्सिअस तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मागील तीन दिवसांत तब्बल सात अंश सेल्सिअस तापमानाची भर पडून ४ मार्चला कमाल ४० अंश सेल्सिअस तर किमान २६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा चढता राहिल्याने आगामी काळ त्रासदायक ठरणार, असा तज्ञांचा अंदाज आहे. बुधवारी दुपारी तापमान वाढल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. मागील तीन दिवसांत वातानुकूलन यंत्रांचा वापरही वाढल्याचे दिसून आले आहे.
होळी लागली की उन्हाळ्याची चाहूल लागते, ही पारंपरिक समजूत असली तरी यंदाचा वाढता उष्मा ही केवळ ऋतूची चाहूल नसून हवामानातील बदलांचे स्पष्ट संकेत असल्याची चर्चा पर्यावरण अभ्यासकांमध्ये सुरू आहे. शहरातील वाढते काँक्रीटीकरण, झपाट्याने कमी होणारी झाडांची संख्या, जलस्रोतांचे आटत चाललेले अस्तित्व आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ‘हीट’ अधिक तीव्र होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रंगपंचमीसारखा जल्लोषपूर्ण सणही दुपारनंतर शांत पडला. उष्माघाताचा धोका, आणि लहान मुलांच्या तब्येतीची काळजी यामुळे अनेकांनी सावध भूमिका घेतली. काही ठिकाणी पाण्याचा मर्यादित वापर आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याकडे कल दिसला, ही पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, तापमानातील ही वाढ केवळ एका दिवसाची बाब नसून दीर्घकालीन हवामान बदलाचा परिणाम आहे. शहरातील हिरवळ वाढवणे, छतांवर सोलर पॅनल्स आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती, सार्वजनिक ठिकाणी शीतल सावली देणारी वृक्षलागवड आणि पाणी व्यवस्थापन यावर तातडीने भर देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत मार्च महिन्यातच एप्रिल-मेची झळ बसू शकते.
सध्या वाढलेले तापमान नागरिकांसाठी इशारा ठरत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्यावर संरक्षणात्मक आच्छादन वापरावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.