येत्या मंगळवारी ग्रहणातच चंद्र उगवणार!

मुंबईत तीन मिनिटे, पुण्यात सात मिनिटे दिसणार

ठाणे: येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी ग्रहणातच चंद्र उगवताना आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक अविष्कार आहे, तो सर्वांनी साध्या डोळ्यांनी पहायला पाहिजे. सध्या काही प्रसार माध्यमातून या चंद्रग्रहणाविषयी भीती दाखविली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे, असे मत श्री.सोमण यांनी मांडले.

जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते, तेव्हा चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्र दृश्य आकाशात असतो तेथून ते चंद्रग्रहण दिसते. मंगळवार 3 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होईल, परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही. तो पूर्व क्षितिजाखाली असेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी
ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. सायंकाळी 6.48 या एकाचवेळी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे श्री.सोमण यांनी सांगितले.

मुंबई येथे चंद्रोदय सायंकाळी 6.45 वाजता होणार आहे. ग्रहण सायंकाळी 6.48 वाजता सुटणार आहे. म्हणजे मुंबईत फक्त तीन मिनिटे चंद्रग्रहण दिसणार आहे. पुणे 6.41, नाशिक 6.40, कोल्हापूर 6.40, नागपूर 6.18, सोलापूर 6.33, रत्नागिरी 6.44 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 6.34 वाजता चंद्रोदय होणार आहे. सर्वत्र चंद्रोदयापासून 6.48 पर्यंत चंद्रग्रहण दिसणार आहे. ग्रहणवेधकाळात धूलीवंदन करता येते. होळीचा रंगांचा सण साजरा करता येतो, असेही श्री.सोमण म्हणाले.

आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे ?” असे जेव्हा लोक विचारतात तेव्हा जे लोक चंद्रग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे, असे श्री.सोमण म्हणतात.