भाईंदर : मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत ९२१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून मैदानी चाचणी दरम्यान चांगली कामगिरी करण्यासाठी शरीरात उत्तेजित द्रव्य (ड्रग्ज) इंजेक्शनद्वारे टोचत असताना एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजल्यापासून उमेदवारांना प्रवेश दिला जात होता. यात सोमवारी २५०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. मैदानात अंमली पदार्थ तपासणीच्या गस्ती पथकाकडून गस्त सुरू असताना शंभर मीटर ट्रॅकजवळच्या बिस्कीट आणि ग्लुकोजच्या तंबूच्या मागील बाजूच्या आडोशाला उभे राहून शरीरात उत्तेजित द्रव्य (ड्रग्ज) इंजेक्शनद्वारे टोचत असताना उमेदवार सापडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तत्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. साहिल अवघडे (२३) असे या उमेदवाराचे नाव असून तो बारामती येथील राहणारा आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुशांत मुर्गे यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.