नवी मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गट आमने सामने
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्याच महासभेत परिवहन समितीच्या स्थापनेवरून जोरदार राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. परिवहन समितीच्या १२ जागांच्या वाटपावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना आमने-सामने आल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिवहन समितीच्या ,१२ जागांसाठी भाजपने १२ जणांची नावे दिली होती. शिवसेनेने देखील आठ नावे दिली होती. पक्षीय बलानुसार या नावांची निवड होईल अशी आशा शिवसेना शिंदे गटाला होती, मात्र सचिवांनी ही निवडणूक कलम २५ (२) व(३) प्रमाणे होणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे या १२ जागांसाठी संख्याबळाच्या जोरावर हात वर करून मतदान घ्यायचे की कायद्यानुसार पक्षांना त्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायचे, या मूलभूत मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले. शिंदे गटाच्या सदस्यांनी कायद्यानुसार प्रमाणात्मक प्रतिनिधित्वाची मागणी केली, तर भाजपने सभागृहातील बहुमताच्या आधारे निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या मांडला. महापौर मतदानाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी महापौर आसनाजवळ जात घेराव घातला. यावेळी महापौर सुजाता पाटील यांच्या बचावासाठी भाजप महिला नगरसेविका देखील धावून आल्या. त्यामुळे सभागृहात काही तणाव निर्माण झाल्याने सभागृह १५ मिनिटे तहकुब करण्यात आले. त्यानंतर महापौर मतदान प्रकियेवर ठाम राहिल्याने शिवसेनेने महापौरांच्या मनमानी कारभाराचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर महापौरांनी परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली.
परिवहन समितीच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभागृह नेते सागर नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडल्याचा दावा केला. “जनतेचा कौल भाजपसोबत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे नियमानुसारच समिती स्थापन करण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. तर राज्यातील सर्व महानगरपालिकेत तौलनिक पद्धतीने सदस्य निवड केले असताना याच महापालिकेत २५ (२) व (३) नुसार सदस्य का निवडण्यात आले? तसेच सभागृह नेते सागर नाईक यांनी २००७ चा जो न्यायालयाचा दाखला दिला त्याप्रमाणे २०१० आणि २०१५ मध्ये सदस्य निवड का करण्यात आली नाही? त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही नगरविकास खात्याकडे अपील करणार आहोत, असे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितले.
नवनिर्वाचित परिवहन समिती सदस्य
विकास झंजाड, ॲड.यशपाल ओव्हाळ, अभिजीत पेडणेकर, विनोद म्हात्रे, राहुल शिंदे, राजेश्री कातकरी, रोशन पाटील, हनुमंत रोडे, कुणाल महाडिक, तीर्था सकपाळ, राजेश राय, शीतल भोईर