वसई: वसईतील पापडी येथील प्रतिष्ठित अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी २०२५ च्या युनेस्को आशिया-पॅसिफिक मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
युनेस्कोने जाहीर केलेल्या या सर्वोत्कृष्ट दहा संवर्धन प्रकल्पात वसईतील पापडी येथील ४७५ वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलचाही समावेश आहे. वसईतील हे चर्च सोळाव्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना असून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यासाठी सुमारे ४.७५ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला होता.
या चर्चच्या नूतनीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे सिमेंटचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने चुन्याचा वापर करून चर्चची डागडुजी करण्यात आली आहे. मुंबईचे प्रसिद्ध वास्तुविशारद संस्था सवानी हेरिटेज कॉन्सर्व्हेशन, वसईतील गिरिज येथील सिक्वेरा फाइन आर्ट आणि स्थानिक कुशल कामगारांच्या मदतीने २०२३-२४ वर्षात चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले. तसेच चर्चच्या गाभाऱ्याचा भाग लाकडाच्या कोरीवकामाने सजवण्यात आला आहे.
२००० सालापासून दरवर्षी युनेस्कोकडून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विविध देशातील वास्तू, वसाहती आणि प्रकल्पांना आशिया-पॅसिफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्काराला २५ वर्षे पूर्ण झाले असून रौप्य महोत्सवी वर्षात, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील १० उत्कृष्ट प्रकल्पांना त्यांच्या संवर्धन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
एकूण १६ देशांमधून ९० नामांकनं पुरस्कारासाठी प्राप्त झाली होती. सात सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी समितीने प्रकल्पाची समज म्हणजेच वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व किती जपले गेले आहे, तांत्रिक कौशल्य म्हणजेच वास्तूच्या संवर्धनासाठी वापरलेले पद्धत, शाश्वतता आणि परिणाम म्हणजेच वास्तूचा किंवा प्रकल्पाचा समाजावर आणि पर्यावरणावर दीर्घकालीन होणारा सकारात्मक परिणाम, अशा तीन मुख्य निकषांच्या आधारे विजेत्या प्रकल्पांची निवड केली.