भाजपाचा फुटीचा डाव?
भिवंडी: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी अखेर सेक्युलर फ्रंट, काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांच्या जोरावर महापौरपद पटकावले. उपमहापौर पदावर काँग्रेस-सेक्युलर फ्रंटचे तारीक मोमीन विजयी झाले आहेत.
अनपेक्षित झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपच्या सहा नगरसेवकांनी नारायण चौधरी यांना मतदान केल्यामुळे त्यांचा विजय झाला. चौधरी यांनी शिवसेना, कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील आणि भाजपचे उमेदवार स्नेहा पाटील यांचा पराभव केला. तर उपमहापौर तारीक मोमीन यांनी शिवसेना, भिवंडी विकास आघाडीचे उमेदवार जावेद दळवी व भाजपाचे उमेदवार सुहास नकाते यांचा पराभव केला. त्यामुळे झालेल्या या अनपेक्षित युती-आघाडीचा जोरदार फटका भाजप पक्षाला दोन्ही बाजूंनी बसला आहे.
महापालिकेच्या सभागृहात ठाणे जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर मनपा आयुक्त अनमोल सागर उपस्थित होते. दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या निवडणुकीसाठी महापौर पदासाठी १० तर उपमहापौर पदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती पिठासीन अधिकारी पांचाळ यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना देऊन अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला. त्यामुळे महापौर पदासाठी दुहेरी अर्ज दाखल केलेला एक अर्ज नारायण चौधरी यांनी मागे घेतला. त्यानंतर कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील, नगरसेवक ॲड. मयुरेश पाटील, शिवसेनेच्यावतीने नगरसेवक बाळाराम चौधरी, नगरसेविका सुचिता म्हात्रे, काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक तारीक अब्दुल बारी मोमीन, भिवंडी विकास आघाडीचे नगरसेवक जावेद दळवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे महापौर पदासाठी नारायण चौधरी, विलास पाटील व स्नेहा पाटील हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे श्री.पांचाळ यांनी जाहीर केले.
पिठासीन अधिकारी पांचाळ यांनी केलेल्या सुचनेनुसार हात वर करून महापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी नारायण चौधरी यांना ४८ नगरसेवक सदस्यांनी पाठिंबा दिल्याने ते विजयी झाल्याची घोषणा पांचाळ यांनी केली. शिवसेना कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील यांना 25 तर भाजपचे उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी 16 मते मिळाली. त्यामुळे नारायण चौधरी हे विजयी झाले.
उपमहापौर पदासाठी एकूण सात अर्ज दाखल करण्यात आले होते. तर माघार घेण्याच्या वेळेस शिवसेनेच्या अस्मिता नाईक, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी (दुहेरी अर्ज) समाजवादीचे याकूब शेख, कोणार्क विकास आघाडीचे ॲड. मयुरेश पाटील या नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे मोमीन तारीक, भाजपचे सुहास नकाते, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी हात वर करून घेतलेल्या मतदानात काँग्रेस पक्षाचे मोमीन तारीक हे ४३ मते घेऊन विजयी झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी यांनी केली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास नकाते २१, तर भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांना २५ सदस्यांनी मतदान केल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. निवडणुकीनंतर पिठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.