सत्तेचे ‘कमळ’ ‘हाती’ लागेल, की ‘बाण-धनुष्याचा’ वर्मी बसेल?

आज भिवंडी महापौर-नाट्य!

भिवंडी: चंद्रपूर महापालिकेवरून उडालेली राजकीय धूळ खाली बसत नाही तोच भिवंडी महापालिकेत उद्या होणाऱ्या महापौर निवडणुकीवरून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भाजप फुटणार की काँग्रेस डाव साधणार, शिवसेना ‘कार्यक्रम’ करणार की अपक्षांच्या तालावर तथाकथित राष्ट्रीय पक्ष नाचणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी केलेले दावे आणि प्रति-दावे गोंधळात भर घालत असून भिवंडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

महाराष्ट्रात गाजत असलेल्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेगळे वळण लागले असून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेत जास्त नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाने अचानक एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांना महापौर पदासाठी उमेदवारी जाहीर करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. काँग्रेसच्यावतीने महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगरसेवक मोमीन तारिक अब्दुल बारी यांना याच व्हीपमधून उपमहापौर पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनी हे जाहीर प्रसिद्धी पत्र काँग्रेस गटनेत्याला पाठविले आहे.

देशात आणि महाराष्ट्रामध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस व भाजपमध्ये “सेक्युलर फ्रंट” च्या नावाखाली होणारी ही युती महाराष्ट्रात वेगळा पॅटर्न निर्माण करीत असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे भिवंडीतील महापौर व उपमहापौर निवडणुकीची सत्ता समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहे. मात्र त्याचवेळी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि भिवंडीतील खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस महापौरपदासाठी भाजपचा पाठिंबा घेणार नसून त्यांना पाठिंबाही देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

बहुचर्चित भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या शुक्रवार (२०फेब्रु.) रोजी

उद्या ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, कोणार्क विकास आघाडी व भिवंडी विकास आघाडी सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करीत आहे. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस ३०, शिवसेना १२, भाजप २२, राष्ट्रवादी काँग्रेस १२, समाजवादी पक्ष ६, कोणार्क विकास आघाडी ५, भिवंडी विकास आघाडी ३ असे ९० नगरसेवक निवडून आलेले आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी यांच्यामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सध्या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी पक्षादेशानुसार पुढाकार घेतला आहे. असे असताना भाजपच्या काही नगरसेवकांनी वेगळी चूल मांडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कालपासून भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. हे पाहून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेने देखील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आपल्या नगरसेवकांना उतरवून महापालिकेत महायुती नसल्याचे चित्र निर्माण केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील एक गट शिंदे गटाला पाठिंबा देऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.

भाजपच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार महापौर पदासाठी भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांची उमेदवारी जाहीर केलेली असताना भाजपचे शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी अचानक काल बुधवार (१८ फेब्रु.) रोजी स्नेहा मेहुल पाटील यांना महापौर पदासाठी उमेदवार जाहीर करून भाजपच्या सर्व नगरसेवकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे भाजपात पुन्हा एकदा गटबाजी असल्याचे उघड झाले. या घटनेची दखल घेत भाजपचे उमेदवार नारायण चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत मी सेक्युलर फ्रंट बरोबर जात असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे महापौर पदासाठी राजकीय समीकरण बदलत असताना काल बुधवार रोजी रात्री अचानक ३० काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी चौधरी यांच्याशी सलगी केली.

मागील निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने चार नगरसेवक असलेल्या कोणार्क आघाडीला पाठिंबा देत विलास पाटील यांना महापौर केले. यात कोट्यवधींचा घोडेबाजार झाला आहे. त्यामुळे यावेळीही मोठ्या घोडेबाजाराची दाट शक्यता आहे. अर्थात उद्या सकाळी काहीही घडू शकते? असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.