नवी मुंबई: सोमवारी नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या हंगामातील पहिल्या १०० पेट्या दाखल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
*दरवर्षी फेब्रुवारी ते मे या कालावधीत चालणाऱ्या हापूस आंब्याच्या हंगामाची ही अधिकृत सुरुवात आहे. मात्र यंदा हवामानाच्या परिस्थितीमुळे आंब्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात मार्च महिन्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
वाशीतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. बाजारात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तुरळक एक-दोन पेट्या जरी दाखल होत असल्या तरी मुख्य हंगाम मार्चपासूनच सुरू होतो. असे असले तरी यंदा बाजारात फेब्रुवारीच्या मध्यातच बाजारात १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदा कडक थंडी आणि अकाली हवामानातील बदलांमुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे पुरवठ्यावर मर्यादा येऊन आंब्याच्या किमती गगनाला भिडल्या.
पहिल्या दिवशी दाखल झालेल्या डझनभर लहान हापूस आंब्याला सुमारे १,५०० रुपयांचा भाव मिळाला तर मोठ्या हापूस आंब्यांची किंमत प्रति डझन २,५०० रुपये होती. बाजारात सोमवारी जरी १०० पेट्या दाखल झाल्या असल्या तरी यंदाची पीक परिस्थिती पाहता, १ मार्चनंतरच हापूस आंब्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या, मर्यादित आवक असल्याने किमती कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे येत्या काळात आवक वाढली तरच ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.