कडोंमपाचा अजब कारभार
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली तब्बल 40 दिवस जेलमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्याला महापालिकेकडून पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी महापालिकेचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनाही तब्बल सहा महिन्यांनंतर समजली. या प्रकारामुळे पोलीस तपास आणि महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 3 मे 2025 रोजी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी बीएनएस 64 (2), बीएनएस 69, 115 (2) आणि 352 या कलमान्वये कारवाई करत त्याला अटक केली होती. अटकेनंतर तो तब्बल 40 दिवस न्यायालयीन कोठडीत, म्हणजेच जेलमध्ये होता. लत्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, अटकेच्या वेळी आणि त्यानंतरच्या तपासातही हा आरोपी सरकारी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांच्या समोर आली नव्हती. तपास सुरू असतानाच सहा महिन्यांचा काळ उलटल्यानंतर, 27 डिसेंबर 2025 रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कडोंमपा प्रशासनाला पत्र पाठवले. या पत्रात आरोपी हा तुमचा कर्मचारी असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो 40 दिवस जेलमध्ये होता, अशी माहिती देण्यात आली. हे समोर येताच महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली.
आरोपी ‘फ’ प्रभाग कार्यालयात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तो जेलमध्ये असतानाही महापालिकेने त्याचा पगार रोखलेला नव्हता. शासकीय नियमांनुसार कोणताही कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत किंवा जेलमध्ये असल्यास त्याचे तत्काळ निलंबन अपेक्षित असते. मात्र, आरोपी 40 दिवस गैरहजर असतानाही त्याची हजेरी नेमकी कोणी आणि कशी लावली, तसेच त्याला पगार कसा देण्यात आला, हा मोठा प्रशासकीय आणि तांत्रिक घोळ समोर आला आहे.