क्लस्टरच्या माध्यमातून हिरानंदानी करणार पूर्व ठाण्याचा विकास

* ३० ते ४० हजार कुटुंबांना मिळणार दर्जेदार घरे आणि आधुनिक सोयी-सुविधा
* आनंदनगर वगळून ५८ हेक्टर जमिनीचा होणार विकास

आनंद कांबळे/ठाणे

क्लस्टर योजनेकडे मोठमोठे बांधकाम व्यावसायिक पाठ फिरवत असताना पूर्व ठाण्यातील कोपरीच्या क्लस्टर योजनेचे काम मात्र सुप्रसिद्ध बांधकाम विकासक हिरानंदानी हे करणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दर्जेदार घरे मिळणार असून सर्वात मोठा प्रकल्प म्हणून नावारुपास येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी हा मतदारसंघ आहे. क्लस्टर योजना हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ठाण्यातील किसन नगर भागात क्लस्टर योजनेचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. कोपरी आणि इतर भागातील क्लस्टर योजनेचे काम करण्यासाठी ‘महाप्रित’ ही शासनाची संस्था नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. ‘महाप्रित’ने काढलेली निविदा हिरानंदानी यांना मिळाल्याची माहिती सूत्राने दिली असून कामाबाबत कागदपत्रांची पूर्तता सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

पूर्व भागातील यूएसपीआर हा एक असून या भागातील ५८ हेक्टर जमिनीचा विकास केला जाणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गापासून अष्टविनायक चौक यामध्ये आनंद नगर भागाचा समावेश नाही. या भागातील सुमारे 30 ते 40 हजार कुटुंबांचे क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाणार आहे.

ठाणे पूर्व भागातील कुटुंबांना दर्जेदार घरांसह नागरी सुविधा मोठ्या प्रमाणावर मिळणार असून या भागातील नागरिकांना मैदान, प्रशस्त रस्ते, मार्केट, मॉल, शैक्षणिक संस्था, मनोरंजनाची साधने भविष्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा भाग झोपडपट्टीमुक्त होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

ठाण्यातील धोकादायक अधिकृत तसेच अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पाठपुरावा करून ठाण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करून घेतली होती. ही योजना राबविणे कठीण असल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली होती. त्यामुळे खाजगी विकासक या योजनेत सहभागी होण्यासाठी कचरत होते, परंतु उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अनेकदा मोठमोठ्या विकासकांबरोबर चर्चा करून त्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हिरानंदानी यांनी पहिले पाऊल उचलले आहे. त्यामुळे भविष्यात मोठमोठे बांधकाम व्यावसायिक क्लस्टर योजनेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वप्न साकार करतील, अशी अपेक्षा एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.