नेत्यांनो ‌’नॉर्मल’ व्हा !

राजकारण इतके भावनाशून्य असते का, की ज्या कुटुंबावर आकस्मिक दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे, त्या कुटुंबाला सावरण्यासाठी काही क्षणही दिले जाऊ नयेत? माध्यमांमुळे मानवी जीवनातील दु:खाचे प्रसंगही अलिकडे ‌’इव्हेंट’ होऊ लागले आहेत. ‌’अश्रू’ टिपणारे अत्याधुनिक हाय-पिक्सेल कॅमेरे सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या तथाकथित सेलिब्रेटीज्‌‍चा जणू पिच्छाच सोडत नाहीत. दु:खाचे भांडवल होऊ लागले आहे. टीआरपीचे गणित जमवताना इतकीही शुद्ध राहत नाही की दु:खद बातम्यांच्या दरम्यान आनंददायी जाहिराती दाखवल्या जातात! हे सर्व अनैसर्गिक आहे. किळसवाणे आहे. ही पथ्ये पाळली जात नसल्याने माध्यमे टीकेची लक्ष्य होऊ लागली आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर अपघातात मरण पावलेल्या अन्य पाच जणांकडे झालेले दुर्लक्ष! एकुणातच आपत्कालिन परिस्थितीत संवेदना आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे भान सुटत चालले आहे. अजितदादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा अस्थिविसर्जनही होत नाही तोवर सुरू होणे, हे निश्चितच सुसंस्कृतपणा, सभ्यता आणि तथाकथित परिपक्व राजकारणाची ओळख होऊ शकत नाही. हे सारे पुरोगामी महाराष्ट्रात होत असल्याचे दु:ख आहे.

राजकारण वेगवान झाले आहे की ते तसे मुद्दाम करण्यात आले आहे? उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय पवार कुटुंबियांना दु:खातून सावरण्यापर्यंतही थांबवता येत नव्हता का? नव्या उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा आणि निर्णय ही राजकीय गरज होती की पुन्हा माध्यमांचा उताविळपणा? अजितदादांच्या मृत्यूमुळे केवळ राजकीय आघाडीवर अशांतता पसरलेली नाही तर समाजालाही त्याचा धक्का बसला आहे. आपण परिस्थिती ‘नॉर्मल’ होण्याची वाट पाहणार आहोत की नाही? याबाबतीत मला ‘सामना’चे संपादक खा. संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका पटली. राजकारण काही काळ बाजूला ठेवा अशी विनंती प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना त्यांनी केली. राजकारणाकडे करमणूक म्हणून पाहण्याची वेळ आली आहे आणि त्याची जबाबदारी पत्रकारांची जितकी आहे तितकी नेत्यांचीही. त्यांनीही आपल्या वाणीला विराम देण्याची गरज आहे.

अजितदादांच्या अकाली निधनामुळे सर्वांच्या मनात जीवन क्षणभंगुर असल्याचा पुन: प्रत्यय आला असणार. अहोरात्र एका नशेत, झपाटल्यागत, मानसिक आणि शारीरिक वणवण करणाऱ्या समस्त नेतेमंडळींना त्यांची गती कमी करण्याचा इशाराच मिळाला आहे. महापालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांची धावपळ संपत नाही तोच जिल्हा परिषदेची धामधुम सुरू झाली. सर्वच नेते रात्रीचा दिवस करुन कामाला लागले. अपुरी झोप, जेवणाखाण्याचे बिघडलेले वेळापत्रक आणि रात्री-अपरात्रीचा प्रवास यामुळे वरुन निरोगी दिसणारे नेते आतून पोखरून निघत आहेत. आमच्या माहितीनुसार अनेक नेते रात्रीत सलाईन लावून दुसऱ्या दिवशी जनसेवेसाठी (?) घराबाहेर पडत आहेत. ही झीज साठीच्या उंबरठ्यावर आलेल्या नेत्यांना दीर्घकालीन व्याधीचे लक्ष्य करीत आहे. परंतु व्यक्तीगत महत्वाकांक्षा आणि त्याला कधी पक्षवाढीचे तर कार्यकर्त्यांच्या उत्कर्षाचे कोंदण देऊन नेते काळ-वेळ न पाहता पळत सुटले आहेत. त्यांच्या क्षमतेपेक्षा ते जोरदार पळत सुटले आहेत. अंतिम महत्वाकांक्षा मृगजळासारखी त्यांना खुणावत राहते. हा अट्टाहास कुठेतरी थांबायला हवा. त्यासाठी नेत्यांनीच आपल्या उत्साहाला बांध घालायला हवा. परंतु कोणी ते लक्षातच घेत नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा सिद्धांत आयुष्य जगताना आचरणात आणावा लागेल. ८० टक्के वेळ महत्त्वाकांक्षेस देणे ‌’नॉर्मल‌’ खचितच नाही!