मुंबई: सडलेलीं पाने झडलीच पाहिजेत, त्याशिवाय नवीन कोंब फुटत नाहीत. शिवसेनेत पानगळ झाली असून आता नवीन पालवी फुटू लागली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला हाणताना उपस्थित शिवसैनिकांमध्ये जोश भरला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य नेते उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच संजय राऊत, अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
बाळासाहेबांनी आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदू म्हणून लोकांना मतदान करायला लावेन, या बाळासाहेबांच्या विधानाबाबत भाजपच्या एका नेत्याने हे शक्य नसल्याचे सांगितले. पण बाळासाहेबांनी ते करून दाखवले. त्यामुळे शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, असा टोला श्री.ठाकरे यांनी हाणला.
राज आणि माझं बालपण एकत्र गेलं, आम्ही वादळात खेळत मोठी झालेली मुलं आहोत, त्यामुळं वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. वादळाशी जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्यालाच कळू शकतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधकांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, त्याला मी काही करु शकत नाही. जेव्हा आपण महाराष्ट्राचा, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापूर्वीचा विचार केला तरी गद्दारी हा विषय आजचा नाही. हा आपल्याला शाप लागलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर महाराष्ट्रानं जगाचा इतिहास बदलून दाखवला असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार हे चित्र उभे केले जात होते, त्यांना तुम्ही रोखलंत, हे फक्त महाराष्ट्र करु शकतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. संपूर्ण महाराष्ट्र यांना वेगळ्या पद्धतीनं पादाक्रांत करायचाय, महाराष्ट्र गिळायचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेला नवी पालवी फुटलेली आहे. पानगळ होणं गरजेचं असतं. सडलेली पाने झडलीच पाहिजेत, ती सडेपर्यंत नवे कोंब फुटत नाहीत. सडलेल्या पानात जीव नाही, विकली गेलेली पानं झाडाला तरारी देऊ शकणार नाही, असा टोला श्री.ठाकरे यांना लगावला.