ठामपाच्या तिजोरीची चावी जाणार शिंदे गटाच्या हाती

ठाणे: ठाणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्याही पाठिंब्याशिवाय शिवसेनेच्या ताब्यात राहणार असून सेनेचे नऊ सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार असल्याचे संख्यबळानुसार स्पष्ट झाले आहे.

महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. शिवसेनेला ७५ जागांवर यश मिळाले आहे तर भाजपाला २८ जागी विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदरात १२ जागा पडल्या आहेत. अजित पवार राष्ट्रवादीला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. उबाठाला एक आणि अपक्ष एक असे संख्याबळ महापालिकेत असून स्थायी समितीच्या १६ जागा संख्याबळानुसार निवडल्या जाणार आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला नऊ, भाजपाला तीन राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार आणि एमआयएम यांना प्रत्येकी एक जागा स्थायी समितीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेच्या ताब्यात राहणार आहेत.

महापौर पदाची निवडणूक पुढील महिन्यात झाल्यानंतर स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असून विविध पक्षाच्या गट नेत्याच्या शिफारशीनुसार सदस्य निवडले जाणार आहेत. त्यानंतर ही निवडणूक जाहीर केली जाणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले