ठाणे: दोघांचे भांडण तिसऱ्यांचा लाभ या म्हणीचा प्रत्यय मुंब्रा येथे महापालिका निवडणुकीत आला आहे. अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वादात एमआयएम यांना लॉटऱी लागली असून त्यांचे तब्बल पाच नगरसेवक निवडून आले आहेत.
प्रभाग २६मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आखलक कुरेशी यांना ६,५९२, अजित पवार गटाचे विश्वनाथ भगत यांना ५३८१ इतकी मते मिळाली तर या प्रभागात बाजी मारलेल्या सैफ पठाण यांना १०,३१६ मते मिळाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मते ११,९७३ एवढी होत असून विजयी उमेदवारापेक्षा मतांची संख्या अवघ्या दीड हजार मतांनी जास्त आहे. प्रभाग 30 (अ)मध्ये देखील शरद पवार राष्ट्रवादीचे नाजीम अन्सारी यांना ८५०९ तर अजित पवार राष्ट्रवादीचे अबीद कलदाने यांना ७१६९ मते मिळाली होती तर विजयी उमेदवार एमआयएमचे नफिस अन्सारी यांना ११,५४६ मते मिळाली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज १५,६७८ एवढी होत असून विजयी उमेदवारापेक्षा ही मते चार हजारपेक्षा जास्त आहे. याच प्रभागातील (ब) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रुमाना शेख यांना ७६६५ तर अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार सिद्धीकी फरहा यांना ६०५७ मते मिळाली. एमआयएम पक्षाचे उमेदवार सहारा शेख हिला १२,९६४ मते मिळाली. दोन राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज १३,७२२ एवढी होत असून विजयी उमेदवारापेक्षा अवघी सातशे मते जास्त आहेत. प्रभाग ३० (क)मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार तब्बसूम शेख यांना ७४५५ मते मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार नेहा नाईक यांना ८०२७ मते मिळाली. यश मिळालेले एमआयएमच्या उमेदवार सुलताना शेख यांना १०,५१८ मते मिळाली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मते १५,४८२ एवढी असून एमआयएम उमेदवाराच्या मतांपेक्षा पेक्षा पाच हजार जास्त आहेत.
प्रभाग ३०(ड ) मधून विजयी झालेले एमआयएमचे उमेदवार शोएब डोंगरे यांना ११,०४८२ मते मिळाली होती तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सिराज डोंगरे यांना ७५२७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जाफर नोमाणी यांना ७४७६ मते मिळाली होती. या दोन उमेदवारांच्या मतांची बेरीज १४,९७३ एवढी होत असून विजयी उमेदवारापेक्षा ही मते ३५०० मतांनी जास्त असल्याचे दिसत आहे.
पुढील आठवड्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना या दोघांच्या भांडणात त्यांचे पाच नगरसेवक कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यामुळे या पक्षाचे महापालिकेतील अस्तित्व संपले होते. मात्र आता राष्ट्रवादीच्या दोन गटांतील भांडणामुळे पुन्हा वाढले असून दोन संख्यावरून एमआयएम या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या पाचवर पोहचली आहे.