निवडणूक यंत्रणेवर ६४८ कॅमेऱ्यांची करडी नजर

निवडणुकीसाठी ठाणे महापालिका सज्ज

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील 33 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून मतदान आणि मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी मतदान केंद्रापासून स्ट्रॉन्ग रूमपर्यंत सुमारे ६४८ सी सी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यातबळे आहेत. त्याचबरोबर पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील 33 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून 1 ते 28 व 30 ते 33 प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा चार जागांकरीता व प्रभाग क्र. 29 मध्ये अ,ब,क अशा तीन जागांकरीता मतदारांना मतदान करावयाचे आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16 लाख 49,869 इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये आठ लाख 63,878 पुरुष व सात लाख 85,830 महिला आणि 159 इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी नऊ प्रभागांमध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे.

निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीची ठिकाणे, मुख्य स्ट्रॉंग रुम, चेक पोस्ट आदीवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरीता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण 648 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

ठाणे महापालिकेच्या एकूण 11 विभागांमध्ये 45 ठिकाणी एकूण 305 संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण 701 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. निवडणुकीकरीता 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगासाठी व्हीलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत.

मतदान केंद्रावरील कामकाजाकरीता मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान केंद्र अधिकारी व शिपाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झाली असून 20 टक्के राखीव असे मिळून एकूण 12,650 अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही सज्ज असणार आहेत. निवडणूकीकरिता कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट प्राप्त झालेली असून सर्व मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आलेली आहे.

सर्व मतदान यंत्रे सिलबंद करुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्रॉग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहेत.