प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर: प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी सेवेचा सासुरवास संपण्याचे नाव घेत नाही. शनिवारी शहापूर तालुक्यात धावत्या एस.टी. बसचा (एमएच१४ बीटी १८३८) टपावरील लोखंडी भाग अचानक खाली पडल्याने एकच खळबळ उडाली.
ही बस नियमित फेरीवर असताना रस्त्यावरील खड्डे व बसची जीर्ण अवस्था यामुळे टपावरील पत्रा/लोखंडी भाग सैल होऊन खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने ही घटना बसच्या बाजूच्या भागात घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी बसची अवस्था पाहता ती अत्यंत जुनी व देखभालअभावी जीर्ण झालेली असल्याचे स्पष्ट दिसून येते.
बसचा बाह्य भाग गंजलेला, रंग निघालेला तसेच अनेक ठिकाणी तांत्रिक दोष असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अशा स्थितीत या बसला रस्त्यावर धावण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
एस.टी.महामंडळाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची दुरुस्ती व देखभाल असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण आगारांमध्ये आजही अनेक बस ‘सासुरवास’ संपण्याच्या प्रतीक्षेत धावत असल्याचे चित्र आहे. विशेषतः शहापूर, मुरबाड, जव्हार, मोखाडा यांसारख्या आदिवासी व दुर्गम भागात जुन्याच बस पाठवण्यात येतात असा प्रवाशांचा आरोप आहे.
या घटनेनंतर संबंधित बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली असून प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने रवाना करण्यात आले. मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तत्काळ कारवाईची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, एस.टी.प्रशासनाने या घटनेची चौकशी करून संबंधित बस सेवेतून तत्काळ बाद करावी, तसेच आगारातील सर्व जुन्या व धोकादायक बसची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
शहापूर आगारात एकूण ४५ एस.टी.बस कार्यरत असून दिवसाला विविध भागांमध्ये अंदाजे ३३० च्या आसपास फेऱ्या सुरू आहेत. शहापूर आगारातील एस.टी.गाड्यांची दयनीय अवस्था, अपुरा ताफा, वारंवार बिघाड आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे आगार व्यवस्थापन अक्षरशः हतबल झाले आहे. जीर्ण व कालबाह्य गाड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,दैनंदिन फेऱ्या सुरळीत चालविणे हे मोठे आव्हान ठरत आहे.