मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना माझ्यासारख्या पत्रकाराने गावातील तापमानाकडे खरे तर बारीक लक्ष ठेवायला हवे. पण निवडणूक म्हणजे दरवर्षी न चुकता येणारी आषाढी कार्तिकी एकादशी नव्हे ! आठ वर्षे हुलकावणी देणारा लोकशाहीचा उत्सव पुढे जाईल असे वाटल्याने मी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूर येथे आलो. मला पाहून पांडुरंगाच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित आनंद मला स्पष्ट दिसला. त्याने मला न राहवून विचारले: कार्यालयात बसून अग्रलेख लिहिण्या ऐवजी किंवा वृत्त वाहिन्यांवर अनुभवाचे चार आणि अनुमानाचे चाळीस बोल ऐकवण्याऐवजी माझ्या राऊळी वत्सा तू कसा?
त्यावर मी महापालिका निवडणुकीच्या स्थितीचा सविस्तर वृत्तांतच सांगून टाकला. निष्ठावंत कार्यकर्त्यांतर्फे त्यांची कैफियत मांडली. विठोबाने झेंडा हा चित्रपट पाहिला असल्याने त्यातील त्या प्रसिद्ध आर्त गाण्याचा आधार घेत मी उत्तर दिले.
निवडणुकीच्या वारीत मिळे ना वाट
साचले बंडखोरीचे धुके घनदाट
आपली माणसं तिकीट कापती
खंजीर पाठ कोणाची ना सोडती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
आजवर ह्यांची राखली खुर्ची
भलताच त्यांचा हेतु होता
पुरे झाली वंशावर मर्जी
बाप आमचा खोटा होता
उगाळावा कोळसा म्हणुनिया किती
हात काळे आपलेच होती
खुर्चीपायी विरली नाती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
तुतारीगत व्यर्थ हे वाजणं
टिकटिक घड्याळाची आक्रोश होई
भाता रिकामा बघुनी उमगलं
बाण सोडण्याची धनुष्यास घाई
भर उजेडात परी मशाल पेटली
कमळेच उमलण्याची व्यवस्था होती
तरी झेंडे वेगळे, रंग त्यांचे किती
सत्तेची भक्ती विकृती होती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ?
व्यथा ऐकून बोले विठ्ठल
खुर्चीपेक्षा वीट बरी
धनापेक्षा ध्यान बरे
मिळते तेव्हाच प्रेम खरे
सोडून द्यावी महत्त्वाकांक्षा पाण्यात
जोडावे चंद्रभागेशी अभंग नाते अन्
मानावे ज्ञानोबा तुकोबास नेते !
म्हणू नये पताकीस झेंडा
मनी असावा एकच अजेंडा
चिन्ह सारी पडती गळून
व्हावे एकमताने एकरूप
मनपेटीशी होऊन !
‘नोटा’ मार्ग एकच मोक्षाचा
आदर न राहिला कुणाच्या मतांचा…
विठ्ठला नको झेंडा आता कोणाचाच हाती !