आपटे, गोरे, पाटील, बैकर, चतुरे झाले स्वीकृत सदस्य
बदलापूर: बदलापूर नगरपालिकेच्या उप नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका दामले यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या संदेश ढमढेरे यांनी माघार घेतल्याने प्रियांका दामले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपालिकेच्या सभागृहात उप नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. भाजपा राष्ट्रवादी युतीतर्फे राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रियांका दामले आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ॲड. ढमढेरे यांचे अर्ज दाखल झाल्याचे नगराध्यक्षा घोरपडे यांनी जाहीर केले. काही वेळानंतर शिवसेनेच्या ॲड. ढमढेरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी सांगितले.
यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी नेहमी सहकार्याची भूमिका बजावली होती, उप नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी या हेतूने ॲड. ढमढेरे यांचा अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले.
उप नगराध्यक्षपदी प्रियांका दामले यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षा घोरपडे यांनी जाहीर केले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. 49 सदस्य असलेल्या पालिकेत पाच स्वीकृत सदस्य निवडले जाणार असून सत्ताधारी भाजपाचे तीन आणि विपक्षांचे दोन असे पाच सदस्य निवडले जातील असे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांचे दोन-दोन असे चार सदस्य निवडले जावेत,अशी सूचना सेनेच्या म्हात्रे यांनी केली. यावर भाजपा गटनेते शरद तेली, माजी गटनेते नगरसेवक राजेंद्र घोरपडे आणि संभाजी शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला. अखेर भाजपतर्फे तुषार आपटे, शागोफ गोरे, राष्ट्रवादी तर्फे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांची तर शिवसेनेतर्फे दिलीप बैकर आणि हेमंत चतुरे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
नगराध्यक्षा घोरपडे यांनी उप नगराध्यक्षा दामले आणि स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे शहरप्रमुख वामन म्हात्रे प्रशासनातर्फे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी उप नगराध्यक्षा दामले यांचे आणि सर्व स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले,राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उप नगराध्यक्षा दामले यांचे अभिनंदन केले.