अंबरनाथमध्ये सत्तेचे सुकाणू भाजपच्या हाती
अंबरनाथ: नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून काँग्रेसमधून बडतर्फ झालेल्या काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची सदस्य संख्या २५ झाली असून शहर विकास आघाडीतील अजित पवार गट चार तर अपक्ष एक नगरसेवक अशी एकूण ३० सदस्यसंख्या झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सत्तेचे सुकाणू भाजपच्या हाती आले असून शिवसेना (शिंदे गट) एकटी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज नवी मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, दीपेश म्हात्रे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील आदी उपस्थित होते.
भाजपात दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप पाटील, दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड या ११ नगरसेवकांचा समावेश आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत मागील महिन्यात ५९ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. शिवसेना आणि भाजपा यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. या निवडणुकीत शिवसेनेने 24 तर भाजपाने 14 जागी विजय मिळवून नगराध्यक्ष पद देखील पटकावले. मात्र शिवसेनेला सर्वाधिक जागा जिंकूनही नगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली. भाजपा 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चार आणि अपक्ष एक अशा 31 नगरसेवकांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीच्या गटनेतेपदी भाजपच्या अभिजित करंजुले-पाटील यांची निवड केली. याबाबतचे लेखी पत्र नगरपालिका प्रशासनाला दिले होते.
केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आणि भाजपचे सख्य नसताना अंबरनाथमध्ये भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी घेतल्याने ब्लॉक अध्यक्ष पाटील यांच्यासह निवडून आलेल्या 11 नगरसेवकांना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशावरून निलंबित करण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी पत्र दिले होते.
भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय घेताना कोणतीही कल्पना दिली नसल्याचा ठपका नगरसेवक पाटील यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व प्रक्रियेमुळे काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात पक्षशिस्त भंग करणाऱ्या काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र प्रदीप पाटील यांनी भाजपला नव्हे तर विकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे सांगून काँग्रेसला जर आमची गरज नसेल तर आम्हालाही काँग्रेसची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पक्षातून निलंबित झालेल्या काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केल्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडला आहे तर अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट) एकटी पडली आहे.