नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला अंतरिम स्थगिती

उच्च न्यायालयाकडून भाजप उमेदवाराला दिलासा

नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे, आता येथील प्रभागात 15 जानेवारीला मतदान होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 10(1 ड) अंतर्गत भोजनेंचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने अधिकारांचा वापर केल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे भाजप उमेदवार निलेश भोजने यांना दिलासा दिला. त्यानुसार, पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, नवी मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग 17 अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने वेळ न दवडता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपले पॅनल उभे केले असून, थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात लढत आहे. दर्शन भोईर यांनी भाजपातील पक्षप्रवेशानंतर भाजपच्या विचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रभाग 17 अ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, आता भोजने यांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षातील बडे नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करून लक्ष वेधत आहेत. त्यातच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात जवळपास 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी टीका केली होती. यासंदर्भात विरोधी पक्षातील काही नेते न्यायालयात देखील गेले आहेत.