कवच प्रणालीमुळे रेल्वे सेवेत बळकटी येणार
मुंबई : मुंबईतील लोकल सेवा जगातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या वाहतुकीपैकी एक आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वेसेवेमध्ये सुरक्षा वाढविण्यासाठी, मुंबईत अतिरिक्त लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी, पश्चिम रेल्वेवर कवच प्रणाली बसविण्यात येत आहे. ‘कवच’ स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली बसवून एक महत्त्वपूर्ण आधुनिकीकरण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील ६० किमी लांबीच्या चर्चगेट-विरारदरम्यान सुरक्षा प्रणालीचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
भारतातील सर्वात व्यस्त उपनगरीय जाळ्यांपैकी एक असलेल्या पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर रेल्वे सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. चर्चगेट-विरार कवच स्थापना प्रकल्पासाठी ६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची ५० टक्के कामे झाली असून हा प्रकल्प सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर २०२६ मध्ये कवच प्रणाली सज्ज होईल.
चर्चगेट-विरारदरम्यान १७ टाॅवरची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. टाॅवरचे रेखाचित्र, सर्वेक्षण, टाॅवर उभारणीची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १४ ठिकाणी टाॅवर उभारणीच्या कामासाठी माती तपासणी पूर्ण झाली. तसेच १२ ठिकाणी टाॅवरच्या पायाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकांवरील कवच प्रणालीची ३५.३ टक्के कामे पूर्ण झाली असून ६ स्थानके कार्यान्वित झाली आहेत. केबल मार्गाचे सर्वेक्षण आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे कामही वेगाने सुरू असून ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
प्रणालीच्या प्रत्यक्ष कार्यक्षमतेची चाचणी करणाऱ्या लोकोमोटिव्ह चाचणी टप्प्यात ६० पैकी २४ किमीचे अंतर पूर्ण झाले असून ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. अचूक मॅपिंगसाठी आवश्यक असलेले लिडार (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) सर्वेक्षण सुरू आहे आणि जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. ट्रेन ट्रॅकिंगसाठी महत्त्वपूर्ण असलेले आरएफआयडी (रेडिओ-फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅगिंगचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
रेल्वेगाडी चालवताना मोटरमन, लोको पायलट लाल सिग्नल मोडून रेल्वेगाडी पुढे नेतात. त्यामुळे ‘सिग्नल पासिंग ॲट डेंजर’ (एसपीएडी) घटना घडते. या घटना टाळण्यासाठी कवच प्रणाली उपयुक्त ठरते. तसेच, सध्या लोकल मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दोन लोकलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जात आहे. कवच प्रणालीमुळे दोन लोकलमधील अंतर कमी होईल.
कवच प्रणाली ही भारतीय रेल्वेची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश सुरक्षितता वाढविणे हा आहे. ही स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली असून, रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ही प्रणाली रेल्वेची समोरासमोर (हेड-ऑन) किंवा मागून (रिअर-एंड) धडक होण्यापासून वाचवू शकते. या प्रणालीमध्ये सिग्नलची माहिती / गती मर्यादा / हालचालीचा अधिकार यांचे ऑनबोर्ड डिस्प्ले, समांतर रस्ता फाटकावर (एलसी गेट) आपोआप शिट्टी वाजणे, गती मर्यादित ठिकाणी गाडीचा वेग नियंत्रित करणे ही वैशिष्ट्ये आहेत.