अधिकाऱ्यावर २४ तासांत कारवाई करा, अन्यथा ठिय्या

* बिनविरोध निवड प्रकरणाविरोधात मनसे आक्रमक
* मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली आयुक्तांची भेट

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात तेथील निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच सत्वशिला शिंदे यांची भूमिका संशयास्पद आहे. तरीही ह्या अधिकारी मोकाट असल्याचा आरोप करत मंगळवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, ठामपा आयुक्त मुख्य निवडणुक अधिकारी सौरव राव यांची भेट घेतली.

उमेदवारी अर्जामध्ये घोळ घालणाऱ्या या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर २४ तासात कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यावर आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी लवकरच माहितीच्या अधिकारातून या वादग्रस्त अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचा निर्धार बोलुन दाखविला.

सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत वृषाली पाटील आणि प्रभाग ५ मधील वादग्रस्त अधिकारी सत्वशिला शिंदे यांनी पक्षपाती भूमिका घेऊन पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेसह अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज कपटनितीने बाद केल्याचा आरोप करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आल्याचे सांगत अविनाश जाधव यांनी एक चित्रीकरण जाहिरपणे प्रदर्शित केले होते. या बिनविरोध प्रक्रियेत घोळ झाल्याबाबतची सविस्तर तक्रार मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणुक आयुक्तांकडे करून न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. तेव्हा, बिनविरोध निवडणुकीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला तर, पुढच्या खेपेला महापौर देखील बिनविरोध बसेल.,अशी भीती व्यक्त करून अविनाश जाधव यांनी मंगळवारी या निषेधार्थ, आयुक्त सौरव राव यांची भेट घेऊन २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. तर, मनसेच्या या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले आहे, मात्र कारवाई न झाल्यास २५ व्या तासाला पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.