‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार मुलाखत
ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाणेकरांच्या मनातील प्रश्न आणि शहराच्या विकासावर आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधण्यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उद्या बुधवारी ठाण्यात येत आहेत.
ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे बुधवारी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे, त्यांच्याशी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान संवाद साधणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली.
ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीच्या माध्यमातून लढती होत आहेत. केंद्र सरकार तसेच, राज्यातील महायुती सरकारने ठाण्याच्या विकासासाठी बहुमोल असे योगदान दिले आहे. या अनुषंगाने ठाण्याचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीने कंबर कसली आहे. त्यानिमित्ताने रंगायतन येथे आयोजित या चर्चासत्राचे ठाण्यातील विविध २४ ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. तरी, ठाण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित केलेल्या या विशेष चर्चासत्रात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, ठाणे शहराच्या प्रगतीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी केले आहे.