मतदार चिडतात, पण…

मतदारांच्या मनातला संताप त्यांच्या मतदानावर प्रभाव पाडू शकतो का? याचे उत्तर दुर्दैवाने नाही आहे. कारण तसे असते तर ज्या उमेदवारांबद्दल अथवा त्यांच्या पक्षाबद्दल क्रोध आहे ते निवडून आले नसते. थोडक्यात हा राग क्षणभंगुर असतो आणि शहराच्या व्यापक हितासाठी त्याची जागा क्षमाभावना घेत असावी! कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारभाराबाबत एका जाहीर कार्यक्रमात दोन जबाबदार आणि ज्येष्ठ नागरिकांनी सडकून टीका केली आहे. नगरसेवकांवर तोफ डागताना तेच शहरातील बेकायदा बांधकामांच्या पाठीशी उभे रहातात आणि शहराचा उकिरडा करुन टाकतात. आमच्या मते यापेक्षा जहाल मत असू शकत नाही आणि तरीही उकिरडा करणारे नगरसेवक निवडून येत असतील तर समाज राजकारणाकडे गांभीर्याने पहात नाही असाच अर्थ होऊ शकतो.

जनतेच्या महापालिकेकडून फार मोठ्या अपेक्षा नसतात. पुरेसा पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेविरहित रस्ते, अतिक्रमणमुक्त पदपथ, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा, मोकळ्या जागा आदी नागरी सुविधा मिळाल्या की नागरीक खुश होऊन जातात. नगरसेवकाला कार्यक्षम अशी पवातीही ते देऊन टाकतात. परंतु या मूलभूत कर्तव्यांमध्ये कसर राहिली की नागरिकांच्या रोषाला पारावार रहात नाही. कल्याण-डोंबिवलीतील जागरुक नागरिक श्रीनिवास घाणेकर आणि वास्तूविशारद राजीव तायशेटे यांनी अत्यंत परखड शब्दात नगरसेवकांचे वाभाडे काढले आहेत. या दोघांनी सातत्याने महापालिकेच्या कारभारातील त्रुटी जनतेसमोर आणल्या. म्हणजे निवडणूक लागली म्हणून त्यांनी मतप्रदर्शन केले नाही, त्यामागे त्यांचा अभ्यास आणि पाठपुरावा आहे आणि म्हणूनच त्यांच्या आरोपांत गांभीर्य आहे. त्याची दखल प्रशासनाने घेतलीच नव्हती, मग ती मतदार तरी घेणार आहेत का? इथेच गडबड होत आहे. जे बघ्याची भूमिका घेतात अथवा मौन बाळगतात अशा नागरिकांनी किमान जागरुक नागरिकांना पाठिंबा देण्याची तरी भूमिका घ्यायला हवी. मौन संमती देणे हे दांभिकपणाचे लक्षण आहे आणि हा बोटचेपेपणा त्यांना सुशासनापासून कायमच वंचित ठेवणार आहे. चांगले नगरसेवक निवडून आणणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. हा निर्णय विचारमंथनातून व्हायला हवा. हे मंथन होत नाही यामागे मतदारांची उदासिनता हे एक कारण आहे. तर दुसरे कारण हतबलता. कल्याण-डोंबिवलीतील या दोन जबाबदार नागरिकांच्या मनात कळकळ आहे, ती समस्त मतदारांमध्ये आली तरच संतापाला अर्थ प्राप्त होतो.