नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांचा निर्धार
अंबरनाथ: नगरपालिकेच्या प्रांगणात एका शानदार सोहळ्यात अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांनी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या उपस्थितीत आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
मागील महिन्यात थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले-पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. आज शुक्रवारी नगरपालिकेच्या प्रांगणात तेजश्री करंजुले यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
शहरात पाणी, स्वच्छता, आरोग्य या सारख्या समस्या सोडविण्यावर भर देण्याबरोबरच पालिका शाळांचा दर्जा सुधारणे, नगरपालिकेची वेब साईटची निर्मिती करून त्याद्वारे नागरिकांना कर भरणा करणे सोयीचे व्हावे, पालिकेच्या तक्रारींचे निवारण करणे सोयीस्कर होणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
रेंगाळलेली विकासकामे त्वरित पूर्ण करणे, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक दिशा मार्गांची निर्मिती, गरजेनुसार पार्किंग व्यवस्था यासारखी कामे प्राधान्याने हाती घेतली जातील, ठेकेदारांनी दर्जेदार कामे करावीत, त्यांनी केलेल्या कामांची बिले प्रलंबित ठेवली जाणार नाहीत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना विश्वासात घेऊन शहराचा कायापालट करून दाखवू अशी ग्वाही नगराध्यक्षा करंजुले यांनी दिली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक सदाशिव पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रदीप पाटील, पुरुषोत्तम उगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजपा शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले-पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने नागरी सुविधांसाठी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले काम करतील. निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांच्या सर्वांच्या योगदानाने अंबरनाथ शहर सुंदर आणि लोकांना जसे हवंय त्या पद्धतीचं शहर याठिकाणी उदयास येईल, अशी प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.