मुंब्र्यात सर्वाधिक २६९ मतदान केंद्रे
ठाणे: ठाणे महानगरपालिका प्रशासनाने मतदारांच्या सेवा-सुविधा लक्षात घेऊन मतदान केंद्रांचे कडेकोट नियोजन पूर्ण केले आहे. पालिका क्षेत्रातील ३३ मतदान प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान कक्षांची तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंब्रा प्रभाग समितीत सर्वाधिक २६९ मतदान केंद्रे असणार आहेत. तर उथळसर प्रभाग समितीमध्ये सर्वात कमी १५८ मतदार केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. १६ लाख ४९,८६७ मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी प्रभागनिहाय मतदार संख्येनुसार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी तळमजल्यावर १,२०७ कक्ष, पार्टीशन स्वरूपातील ३६१ कक्ष, मंडपांमध्ये ४०३ कक्ष, तर पहिल्या मजल्यावर ४२ कक्ष ठेवण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला व आजारी मतदारांना अडचण होऊ नये यासाठी तळमजल्यावर अधिक कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ईव्हीएम व बॅलेट युनिटची सुरक्षित मांडणी करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मॉक ड्रिल व पूर्वतयारी तपासणीही केली जाणार आहे.
प्रभाग समितीनिहाय मतदान केंद्रे
माजिवडा-मानपाडा: २६६, वर्तकनगर: १८६, लोकमान्यनगर-सावरकरनगर: २४२, कळवा: २६३, उथळसर: १५८, वागळे: १६०, नौपाडा-कोपरी: २१४, मुंब्रा: २६९, दिवा: २५५