प्र.१५मध्ये नव्याने पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने असंतोष
ठाणे: जुन्या कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेविकेला डावलून राष्ट्रवादीतून नुकत्याच भाजपात आलेल्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिल्याने प्र. क्र.१५ मधील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत भाजप कार्यालयात राडा केला.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या तोंडावर उमेदवारीवरून भाजपात असंतोष उफाळून आला. सोमवारी रात्री पक्षाने जाहिर केलेल्या यादीतून अनेक माजी नगरसेवकांची नावे कापण्यात आल्याने त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठून राडा केला. यावेळी कार्यालयात तोडफोडही करण्यात आली. पैसे घेऊन उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत असताना सोमवारी रात्री महायुतीने जागावाटप जाहिर केले. त्यामुळे एबी फॉर्म घेण्यासाठी रात्रीपासूनच पक्षकार्यालयांमध्ये इच्छुकांनी गर्दी केली. ठाण्याच्या वर्तकनगर येथील भाजपच्या कार्यालयामध्येही गर्दी उसळून आली होती. त्याचवेळी प्रभाग क्रमांक १५ मधील नाराज इच्छूकांनी समन्वय समितीविरोधात घोषणाबाजी केली. कार्यालयाच्या केबीनच्या काचा फोडण्यात आल्या. अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांना कोंडून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आले.
प्रभाग क्रमांक १५मधील भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार यादव आणि वर्षा पाटील या दोघांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यांच्याजागी नव्याने पक्षप्रवेश केलेल्या अमित सरैय्या यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी नाकारल्याने भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार यादव, केवलादेवी यादव, महेंद्र सोडारी आणि वर्षा पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत तत्काळ राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताच या चौघांनाही ‘एबी फॉर्म’ देण्यात आल्याने ते आता भाजप उमेदवाराच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.