अपक्ष झाले उदंड!

इच्छुकांच्या वाढत्या दबावामुळे प्रलंबित झालेले तिकीट-वाटप अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाले आणि अनेक ठिकाणी महायुती आणि महाआघाडीला धक्के बसले. ठाणे महापालिकेत महायुती आणि महाआघाडीला धक्के बसले. ठाणे महापालिकेत महायुती टिकल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दोन्ही घटक-पक्षांनी आपापले प्रभाग वाटून घेण्याबाबत नापसंती दर्शवली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. त्यातील अनेक जण ज्येष्ठ असल्याने त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरला. परंतु त्यास अनुकूल प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला. अशा काही उमेदवारांना पक्षातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभत असल्याने महायुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवसेनेने ९० जागा स्वतःकडे ठेवल्यामुळे महापौरपदावर ते दावा सांगू शकतील. याचा अर्थ मुंबईवर शिवसेनेने पाणी सोडले आहे, असा अर्थही निघतो. भाजपची ही खेळी यशस्वी झाली तर मुंबईवरील मराठी माणसाचा प्रभाव कमी होणार आहे. भाजपने ठाण्यात दुय्यम स्थान स्वीकारले असले तरी मुंबईत चित्र वेगळे दिसत आहे. महायुती या निवडणुकीकडे केवळ स्थानिक पातळीवर वर्चस्वाच्या नजरेतून बघत नसून आगामी काळात ठाणे-मुंबई पट्ट्यातील राजकीय नियंत्रण कोणाकडे असेल या दृष्टिकोनातून बघत आहे. नवी मुंबई तसेच मीरा भाईंदरमध्ये सेना-भाजप यांनी काडीमोड घेतल्याचे वातावरण आहे. शिवसेनेकडून बेमालूमपणे मराठी अस्मितेचे कार्ड काढून त्याजागी विकासाचा पत्ता हाती देणाऱ्या भाजपची ही चाल सेनेला आव्हान देणारी ठरणार आहे. ठाकरे बंधूंमधील मतांची विभागणी भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

तिकीट-वाटपाचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कठीण होते. खा.नरेश म्हस्के यांच्या मुलाला तिकीट नाकारणे, गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने जिंकलेल्या श्रीमती प्रमिला केणी, नितीन लांडगे, निखिल बुडजडे, किरण नाकती यासारखे फ्रेश चेहरे यांना तिकीट नाकारणे सोपे नव्हते, परंतु श्री.शिंदे यांनी साहस केले आहे. भाजपा महापौरपदावर दावा करणार नसले तरी शिवसेनेकडून सत्तेत मोठे पद मागण्यात ते मागे-पुढे पाहणार नाहीत. महायुतीतील भांडणाचा फायदा महाआघाडी कशी घेते हे पाहावे लागेल.