ठाणे: उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी मध्यरात्री ठाण्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. अनेक दिग्गज, माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या नावावर काट मारण्यात आली. याचा फटका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनाही बसला आहे.
प्रभाग क्रमांक १९ ड आनंद नगरमधून उमेदवारीसाठी इच्छूक असलेला खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी नाकारली आहे. याची माहिती मिळताच नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवारी आनंदाश्रम गाठून नाराजी व्यक्त केली. महिला आणि तरुण कार्यकर्ते भावुक झाले होते तर काही महिलांना अश्रू अनावर झाले होते
खासदार म्हणून निवडून येण्याआधी नरेश म्हस्के हे आनंद नगर प्रभागाचे नेतृत्त्व करत होते. सलग दोनवेळा ते या प्रभागातून निवडून येत ठाण्याचा महापौर बनण्याचा बहूमानही मिळवला होता. त्यामुळे खासदार म्हणून बढती झाल्यानंतर या प्रभागातील आपली पकड कायम रहावी यासाठी त्यांनी आपला मुलगा आशुतोष म्हस्केला मैदानात उतरवण्याची तयारी केली होती. त्या दिशेने प्रभाग बांधणीचे काम सुरू होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण त्याला पक्षांतर्गत विरोध झाला. येथील कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. त्यांनंतर आनंद नगर येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई येथील शासकीय बंगला गाठला आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रयत्न निष्फळ झाले असून अखेर आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याची कुणकुण लागताच सोमवारी रात्री आनंद नगर परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत नाराजी व्यक्त केली. अनेक महिला ओक्साबोक्शी रडत होत्या. काही तरुण कार्यकर्त्यांनी सेनेविरोधात भूमिका घेण्याची मागणी केली होती, परंतु पक्षापुढे कोणीही मोठा नाही. पक्षाचा निर्णय अंतिम असे सांगून खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांची समजूत काढली. पण मंगळवारी पुन्हा टेंभीनाका येथील आनंदाश्रमात कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आजही महिला भावुक झाल्या होत्या. त्यांची समजूत शाखा प्रमुख महादेव पवार यांनी काढली.
राजकीय वारसदार म्हणून मुलाला ठाणे महापालिकेत पाठवण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे स्वप्न तुर्तास भंग पावले आहे. मात्र पक्षसंघटना मोठी असून अनेकवेळा त्यासाठी त्याग करावा लागतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रभाग क्रमांक १९ च्या पॅनलमध्ये खासदारांच्या मुलाला मागे टाकत शिवसेना शिंदे गटाच्या नम्रता भोसले यांचे कमबॅक झाले आहे. कशिष पार्क येथील त्या रहिवासी असूनही त्यांना सर्वाधिक मतदार असलेल्या आनंद नगरच्या पॅनलमध्ये वर्णी लावण्यात आली आहे. कशिष पार्कमधून माजी नगरसेवक विकास रेपाळे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आनंद नगरचे नेतृत्व कशिष पार्कच्या दोन उमेदवारांकडे गेल्याचे बोलले जाते.