राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची लगबग सुरु असताना अलिकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक निकालाला हिंसेचे गालबोट लागले. रायगड जिल्ह्यात खोपोलीत निवडून आलेल्या नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. राजकारणाचा हा विद्रुप चेहरा आगामी निवडणुकांमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या मतदारांच्या मनाचा थरकाप उडवणारा आहे, प्रत्यक्ष मारहाणीची दृष्ये वृत्तवाहिन्यांनी जितक्या वेळा दाखवली तितकी घृणा समाजमनाला वाटत रहाणार आहे. ही दृष्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी ओळख होणार असेल तर राजकारणाबद्दल आधीच नाराज असलेली जनता त्याकडून समाजहिताची किती अपेक्षा बाळगावी याबद्दल साशंक झाली तर नवल नाही! राजकारण असे जीवघेणे असेल तर त्यापासून दोन हात दूरच रहावे असा विचार लोकशाहीचे संवर्धन आणि कल्याणकारी व्यवस्थेला शह देणारे ठरणार आहे.
राजकारण स्पर्धात्मक झाले आहे यात वाद नाही. तसे व्हायलाही हरकत नाही. परंतु ही स्पर्धा चांगुलपणातून आणि समाजहिताच्या दृष्टीकोनातून होत असेल तर तिचे स्वागतच व्हायला हवे. निवडून आल्यावर आपण जनतेच्या सोयी-सुविधांसाठी झटू, नवनवीन योजना-प्रकल्प राबवू, जनतेशी संवाद साधू आणि समाजात सौहार्दाचे वातावरण राहील याकरिता प्रयत्नशील राहू, हा विचार सकारात्मक स्पर्धेस अनुकूल ठरतो. परंतु निवडून आल्यावर मोठी पदे मिळवू, राजकीय वजन वाढवून स्वत:चे उखळ पांढरे करु, समाजकारणापेक्षा अर्थकारणाला प्राधान्य देऊ आदी नकारात्मक विचार राजकारणाला चुकीचे वळण देतात. लोकांच्या मनात प्रीतीपेक्षा भीती निर्माण करण्याची वृत्ती राजकारणात वाढू लागली आहे. शक्तीप्रदर्शनाला उपद्रवाची किनार लाभली आहे आणि त्यातून हिंसक राजकारणाचा जन्म होत आहे. विचारांपेक्षा शारीरिक शक्तीचा वापर जणू नित्याचा झाला आहे. अशा राजकारण्यांच्या हाती आपण लोकशाहीची सूत्रे सोपवू लागलो आहोत. विशेष म्हणजे फार अपवादात्मक स्थितीत मवाळ आणि निरुपद्रवी उमेदवार देण्याकडे सर्वच पक्षांचा कल दिसू लागला आहे. राजकारणतील गुन्हेगारीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी आंदोलन केले म्हणून किंवा लोकांच्या न्याय-हक्कासाठी कायदा भंग केला म्हणून गुन्हे दाखल होत. आताचे गुन्हे व्यक्तीगत स्वार्थ आणि कुटील कारस्थानाचा भाग बनत चालले आहेत. हा बदल चिंताजनक आहे आणि राजकारण जणू अशा अनैतिक वागण्यासाठी मिळालेले पारपत्र आहे असा समज दृढ होत चालला आहे.
राजकारणात आलो तरच समाजोपयोगी काम करता येते हा समज चुकीचा नाही. सत्तेत असाल तर समाजाबाबत खरोखरीच कळकळ असेल तर हातून उत्तम कामगिरी होऊ शकते. एरवी स्वच्छ हेतू, आदर्श विचार आणि विधायक दृष्टीकोन असूनही उपयोग होत नाही. राजकारणाची साथ असेल तरच हे साध्य आहे. अर्थात या त्रिसुत्री मनाशी बाळगून अनेक जण निवडून येतात पण अखेर राजकारणातील प्रलोभनांना बळी पडतात. अशी शेकडो उदाहरणे सर्वांच्याच नोंदी असतील! त्यामुळे राजकारण हा फसवाफसवीचा आणि दांभिक मनोवृत्तीवाल्यांचा हक्काचा प्रदेश मानला जाऊ लागला आहे. जेव्हा अशा वृत्ती ताबा घेतात तेव्हा नीतीमत्ता, कायद्याची भीती, जनभावनेचा आदर आणि सकारात्मक स्पर्धा हे सारे विषय गळून पडतात. उरते ती फक्त दंडेली, सत्तासंघर्ष, स्वार्थ आणि कायद्याचे उल्लंघन. राजकारणातील निर्ढावलेपण हिंसक वृत्तीस पोषक ठरते. प्रतिस्पर्ध्याला दम देण्याची सवय मद म्हणून बळावत जाते आणि त्या धुंदीत हिंसा कधी ताबा घेते हेच राजकारण्यांना समजत नाही. मद आणि मत्सर हे स्थायीभाव राजकारणाला जनतेपासून दूर सारत आहेत हे कटु वास्तव लक्षात कधी येणार?