ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीचे घोडे जागावाटपावरून अडले आहे. त्यामुळे तिकीट मिळणार की नाही या चिंतेत असलेले इच्छुक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र नेते आऊट ऑफ रेंज असल्याने इच्छुकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. उद्या शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडणार असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होणार आहे.
ठाण्यात शिवसेना आणि भाजपची युती नको असा आग्रह भाजप नेत्यांनी धरला, मंडल अध्यक्षांनी सामूहिक राजीनामेही दिले. महापालिका निवडणूक या कार्यकर्त्यांसाठी असतात, त्यामुळे स्वतंत्रपणे लढल्यास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळते, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांनीही युती नको असा आग्रह धरला, मात्र वरिष्ठांनी आदेश दिल्याने युतीची चर्चा सुरू झाली. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सोमवारी रात्रीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
जागावाटपात काय झाले, आपल्याला तिकीट मिळणार की नाही, एबी फॉर्म कधी मिळणार या प्रश्नांनी इच्छुकांना ग्रासले आहे. अनेक इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांना फोन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता नेते आऊट ऑफ रेज असल्याने ते निराश झाले. एरव्ही पक्ष संघटना, पक्षाचे कार्यक्रम यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचा नियमित संवाद घडत असताना आता नेत्यांशी आम्हाला बोलता येत नाही, अशी खंत एका इच्छुकाने बोलून दाखवली. नेत्यांनी आम्हाला आधीच विश्वासात घेऊन वस्तुस्थिती सांगितली असती तर आम्ही मनाची तयारी करून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कंबर कसली असती. पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला गाफील ठेवण्यात आल्याने आम्ही हतबल झालो आहोत, अशी संतप्त भावना एका इच्छुकाने व्यक्त केली.
एकूणच जागावाटपात तिढा नको तेवढा ताणल्याने शिवसेना आणि भाजपतील इच्छुकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. काहींनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केली आहे तर काहींनी काम न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात उद्या बंडखोरीचे झेंडे फडकतील यात वाद नाही.