शॉर्टकटमुळे मिळणारे यश अल्पजीवी

‘दृष्टी २०२५’ मध्ये आयपीएस वैभव निम्बाळकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
वावीकर आय इन्स्टिट्यूट व ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे : “करिअर घडवताना केवळ पद, पैसा किंवा लोकप्रियतेकडे न धावता सातत्य, कष्ट, मूल्ये आणि योग्य निवड यांवर विश्वास ठेवा. यशासाठी शॉर्टकट टाळा, कारण शॉर्टकटमुळे मिळणारे यश टिकत नाही,” असा प्रेरणादायी संदेश आयपीएस अधिकारी वैभव निम्बाळकर यांनी दिला.
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘दृष्टि २०२५’ हा भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आयपीएस अधिकारी वैभव निम्बाळकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री.निंबाळकर म्हणाले, प्रत्येक यशामागे प्रचंड मेहनत असते. यश सहजासहजी मिळत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रमाशिवाय कोणतीही मोठी अचीव्हमेंट शक्य नाही,” असे ते म्हणाले. यशासाठी शॉर्टकट टाळा, कारण शॉर्टकटमुळे मिळणारे यश टिकत नाही, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
वैभव निम्बाळकर यांनी आपल्या सत्राला ‘CHAT GPT’ असे नाव देत जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले C म्हणजे Choice म्हणजे निवड. आपली संगत, करिअर, वाचन, पाहणारा कंटेंट या सगळ्या निवडी आपल्या हातात असतात. मात्र त्या निवडींचे परिणाम आपल्या हातात नसतात. त्यामुळे कोणतीही निवड करताना तिचे भविष्यातील परिणाम लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. H म्हणजे Health अर्थात आरोग्य. व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेली अनेक उदाहरणे आपण पाहतो. शारीरिक, मानसिक आणि वैचारिक आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही यशाचा आनंद घ्यायचा असेल तर आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. व्यसन ही विकत घेतलेली पिढी आहे,” हे सद्गुरू वामनराव पै यांचे वाक्य त्यांनी यावेळी उद्धृत केले. A म्हणजे Add Value to Your Life स्वतःमध्ये मूल्यवृद्धी करा. आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण विद्यार्थीच असतो. सतत शिकत राहणे आणि स्वतःमध्ये मूल्यवृद्धी करणे आवश्यक आहे. दररोज कौशल्यात एक टक्का सुधारणा केली, तर भविष्यात मोठे यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. T म्हणजे Time अर्थात वेळ. आजची वेळ गेली तर ती परत येत नाही.” योग्य वेळ नियोजन, वाचन, चिंतन आणि परीक्षेची तयारी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी १०-८-६ फॉर्म्युला म्हणजे १० तास अभ्यास, ८ तास झोप आणि आवड जोपासण्यासाठी ६ तास, उपयुक्त ठरतो, असेही त्यांनी नमूद केले. G म्हणजे Gratitude अर्थात कृतज्ञता. आपल्या यशामागे आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजातील अनेक घटकांचे योगदान असते. या सर्वांप्रती कृतज्ञ राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. P म्हणणे पुण्या. चांगली कर्मे म्हणजेच पुण्य. यात कोणतीही अंधश्रद्धा नाही. आयुष्यात आनंद, समाधान आणि चांगली माणसे मिळण्यासाठी पुण्य महत्त्वाचे आहे. येथे पैशाचा उपयोग होत नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले. T म्हणजे Thought अर्थात विचार. आपले वैचारिक विश्व खूप मोठे असते. अंतर्मनातील विचारच बाह्य जग घडवतात. त्यामुळे नेहमी मोठा आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
तरुणांच्या विचारांना दिशा देणारा, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास तसेच सामाजिक जाणिवा वाढवणारा हा उपक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.