जखमी तरुणीची जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

* सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी
* रुग्णाचा लाखोंचा खर्च वाचला

ठाणे: नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात तुटलेल्या जबड्याची मॅक्सिलोफेशियल ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. खाजगी रुग्णालयांचा अफाट खर्च परवडणारा नसताना सिव्हिलच्या उपचारांनी तिला नवे आयुष्य मिळाले.

दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात पूजा (नाव बदलून) या तरुणीच्या डोक्याला आणि जबड्याला जबर मार बसला. अपघात इतका गंभीर होता की पूजाचा जबडा तुटला, एक-दोन दात निखळून पडले आणि तिला तोंड उघडताही येईना. मात्र या अपघातानंतर सुरू झालेली खरी लढाई होती उपचारांची. खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जात असल्याने पूजाच्या कुटुंबावर अक्षरशः संकट कोसळले होते. ‘उपचाराचा प्रश्न कुटुंबाला सतावत असतानाच ठाणे सिव्हिल रुग्णालयात योग्य आणि दर्जेदार उपचार होतील, अशी माहिती मिळाली आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजाला तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिची अवस्था अत्यंत गंभीर होती. वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. ओमकार भोसले आदी तज्ज्ञांनी तत्काळ तपासणी केली. सिटीस्कॅन व एमआरआय अहवालानंतर ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची असल्याचे स्पष्ट झाले.

चेहऱ्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी नायर रुग्णालयातील मॅक्सिलोफेशियल डॉ. कार्तिक पुंजा यांना पाचारण करण्यात आले. सलग चार तास चाललेल्या या अवघड शस्त्रक्रियेत तुटलेल्या जबड्याच्या हाडाच्या जागी नवीन हाड बसवण्यात आले. ही शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय कौशल्याची नव्हे, तर मानवी संवेदनशीलतेचीही कसोटी होती.
आज ती तरुणी पुन्हा हळूहळू सावरते आहे. यासाठी मॅक्सिलोफेशियल डॉ. कार्तिक पूजा, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. ओमकार भोसले, डॉ.रुपाली यादव, डॉ. अर्चना पवार, डॉ. संकेत शिंदे आदींनी अथक परिश्रम घेतले.

“रुग्ण गरीब आहे की श्रीमंत, हा प्रश्न आमच्यासाठी कधीच महत्त्वाचा नसतो. वेळेवर उपचार मिळाले तर जीव वाचतो, हेच ठाणे सिव्हिलचे खरे ब्रीद आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.