भांडवल महत्वाचेच, पण तुमची कल्पनाच खरी करन्सी!

‘दृष्टी २०२५’ मध्ये सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि पर्यावरणवादी विठ्ठल कामत यांचा मंत्र

वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम

ठाणे: ‘योग्य कल्पना, आत्मविश्वास आणि मूल्याधारित दृष्टिकोन असेल, तर यश स्वतःहून वाट शोधत येते. नुसतं भांडवल नव्हे, तर तुमची कल्पनाच तुमची खरी करन्सी आहे’, असा यशस्वी व्यवसायाचा मंत्र नामवंत हॉटेल व्यावसायिक आणि पर्यावरणवादी विठ्ठल कामत यांनी त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना दिला.

वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दृष्टी २०२५’ हा भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे (प.) येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये झाला. या कार्यक्रमात विठ्ठल कामत यांनी तरुणांना उद्योजकतेचे मोलाचे धडे दिले.

“बहुतेक लोक आधी मिळाल्यावर देण्याचा विचार करतात; मात्र मला माझ्या आई-वडिलांनी नेहमी आधी देण्याची शिकवण दिली. देण्यातच खरी संपत्ती आहे,” असे सांगत विठ्ठल कामत यांनी आपल्या जीवनप्रवासाचा उलगडा केला. आजपर्यंत त्यांनी भारतात ६,०३६ हॉटेल्स सुरू केली असून, त्यांच्या या यशस्वी प्रवासाची सुरुवात एका हॉटेलमध्ये ताटे धुण्याच्या कामापासून झाली होती, हे त्यांनी अभिमानाने सांगितले. स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गेल्या ५४-५५ वर्षांपासून या उद्योगात कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योगासाठी भांडवल महत्त्वाचे असले तरी तुमची कल्पनाच तुमची खरी करन्सी आहे, असे सांगत त्यांनी तरुणांना आपली आयडिया प्रभावीपणे मांडण्याचा सल्ला दिला. कल्पना सादर करता आल्या, तर गुंतवणूकदार आपोआप तयार होतात, असे ते म्हणाले.

लंडनमधील सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगताना त्यांनी भारतीय पद्धतीने, यीस्ट न वापरता बनवलेली इडली ‘राईस डम्पलिंग विथ कोकोनट’ या नावाने विकून यश मिळवल्याचे उदाहरण दिले. युनिक असणे आणि वेगळेपण दाखवणे हे उद्योजकतेचे महत्त्वाचे सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांच्या गरजा ओळखून योग्य वेळी त्यांची पूर्तता करणे, कष्टासोबत स्मार्ट वर्क, नियोजन, योग्य स्वभाव आणि सकारात्मक गर्व यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. बंद पडलेली रेस्टॉरंट्स यशस्वीपणे चालवून दाखवताना मिळालेल्या अनुभवातून, संधीचे सोनं करण्याची तयारी आपल्यात असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बिझनेसमधील ६ ‘P’ – प्रॉडक्ट, प्राईस, पॅकेजिंग, प्लेस, पब्लिसिटी आणि पीपल – हे यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, चांगली टीम आणि ग्राहकांशी समजूतदार वागणूक उद्योगाला पुढे नेते, असे त्यांनी स्पष्ट केले. “TEAM म्हणजे Together Everybody Achieves More,” असा मंत्रही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ व व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.