नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत कमळाला बाजूला सारून तुतारी हाती घेतलेले माजी आमदार संदीप नाईक यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी केली आहे. त्यांच्या घरवापसीने भाजपाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे, अशी आशा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील महायुतीमधील शिवसेना आणि भाजपने मनपावर आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे. मागील वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असताना भाजपमधील काही कार्यकर्त्यांना संदीप नाईक यांची उणीव भासत होती.
शिवसेना नवी मुंबईतील नगरसेवक फोडत असताना भाजपने माजी आमदार संदीप नाईक यांना पक्षप्रवेश देऊन स्थानिक भाजपाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संदीप नाईक यांच्या घरवापसीने भाजपाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे, असा विश्वास भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.