* अंबरनाथमध्ये १० परप्रांतीय वेठबिगार कामगारांची सुटका
* ठेकेदाराकडून कामगारांना अमानुष वागणूक
ठाणे : परप्रांतीय १० वेठबिगार कामगारांना रात्री घरात कोंडून ठेवून दिवसा अंबरनाथमधील एका कंपनीत अवजड कामाला जुंपणाऱ्या ठेकेदारावर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कामगारांची सुटका करण्यात येऊन त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यात आले आहे.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या नेतृत्वात नाल्सा योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मे. शक्ती फूड इंडस्ट्रीज कंपनी, अंबरनाथ पश्चिम या कंपनीत असलेल्या 10 परप्रांतियांची बंधबिगाराच्या विळख्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाच्या सदस्या ॲड. तृप्ती पाटील यांनी दिली.
17 डिसेंबर रोजी कमलेश फुन्नन बनवासी, रा. उत्तर प्रदेश या बंधबिगार कामगाराने स्वतःची सुटका करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधल्यानंतर ही बाब उघडकीस आली. जिल्हाधिकाऱी डॉ.पांचाळ यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत संबंधित सर्व विभागांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या तत्परतेमुळे महसूल, पोलीस व कामगार विभाग यांच्याशी समन्वय साधत तातडीची कारवाई सुरू करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील भदोही, जौनपूर आदी जिल्ह्यांतून सिंटु बनवासी (१८), चंदू बनवासी (40) संजय बनवासी (22), कल्लू बनवासी, सुरज बनवासी, संजय बनवासी (१९), सुरेश बनवासी, सुकुड विजई, सुखी पन्ना, विजय कुमार श्रीराम (34) वर्षे यांना ठेकेदार निक्की उर्फ कृष्णा कुमार अग्रहारी व नितिन तिवारी याने चांगल्या कंपनीत 18 ते 20 हजाराची नोकरी तसेच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करुन देतो असे आमिष दाखवून अंबरनाथ पश्चिम येथील मे.शक्ती फूड इंडस्ट्रीज कंपनीत नोकरीला लावले. मात्र प्रत्यक्षात त्यांना अत्यंत जड कामे, उपाशीपोटी काम, अपुरी व निकृष्ट जेवण व्यवस्था, मारहाण व वेतन न देणे अशा अमानुष परिस्थितीला सामोरे जावे लागले. या कामगारांना एका लहान खोलीत कोंबून ठेवण्यात येत असे. रात्री त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले जाई आणि सकाळी पुन्हा कामावर नेले जाई. मोबाईल फोन जप्त करून त्यांचा नातेवाईकांशी संपर्क तोडण्यात आला होता. हा प्रकार संगनमताने व नियोजनपूर्वक करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथचे तहसिलदार अमित पुरी, सर्कल अधिकारी श्री.सागवे, कामगार विभागाचे उपायुक्त संभाजी व्हनाळकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर यांच्या प्रतिनिधी रजनी भोर व त्यांचे इतर सहकारी,तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात येऊन ही संयुक्त कारवाई रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. पहाटे पाच वाजता अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 10 बंधबिगार कामगारांची सुटका करण्यात आली असून, दोन ठेकेदारांना अटकही करण्यात आली आहे.
सुटका करण्यात आलेल्या कामगारांना बंधबिगार प्रमाणपत्र देण्यात आले असून, सर्वच्या सर्व दहाही बंधबिगार कामगार उत्तर प्रदेश येथील त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोहोचले आहेत.