अंबरनाथ: आज झालेल्या मतमोजणीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील निवडून आल्या तर बदलापूरमध्ये शिवसेना-भाजपाने समसमान जागा घेतल्या असल्या तरी तिथेही भाजपच्या रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला. दोन्ही ठिकाणी सेना-भाजप वेगवेगळे लढले असले तरी नगरपालिकांवर झेंडा मात्र भगवाच फडकला आहे.
*भाजपाच्या तेजश्री करंजुले-पाटील नगराध्यक्षपदी*
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांचा भाजपाच्या नवख्या सुशिक्षित उमेदवार तेजश्री करंजुले-पाटील यांनी पराभव केला.
उमेदवार तेजश्री यांनी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचा ६५१७ मतांनी पराभव केला आहे. तेजश्री करंजुले यांना ५४,०९३ तर मनीषा वाळेकर यांना ४७,५७६ मते मिळाली आहेत.
नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार होती, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे १८ दिवस पुढे गेल्याने ही निवडणूक शनिवार २० डिसेंबर रोजी झाली. त्यामुळे प्रचारासाठी जादा दिवस मिळाल्याने भाजपाने त्याचा पुरेपूर फायदा उचलला व शहरांमध्ये दिग्गजांच्या सभा, प्रचार रॅली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा घेऊन अंबरनाथमधील वातावरण ढवळून काढले. या सगळ्या प्रभावी प्रचारामुळे यंदाचे मतदान देखील तब्बल ५५ टक्के झाल्याने हे वाढीव मतदान भाजपा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पोषक ठरले. त्यात भाजपाने तेजश्री करंजुले हा चार्टर्ड अकाउंटंट असलेला सुशिक्षित चेहरा दिल्याने हा चेहरा अंबरनाथकरांना भावला व त्यांनी मतांचे दान तेजश्री करंजुले यांच्या पदरात टाकले.
वीस वर्षांपूर्वी 2005 साली झालेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे गुलाबराव करंजुले पाटील निवडून आले होते. आता 2025 साली पुन्हा थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गुलाबराव करंजुले यांच्या सुनबाई असलेल्या तेजश्री करंजुले पाटील या विजयी झाल्या आहेत.
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये ५९ सदस्यांपैकी शिवसेनेने २७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना ठरला असला तरी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेना जिंकली, वाळेकर हरले. असे चित्र अंबरनाथमध्ये पाहायला मिळाले.
अंबरनाथ नगरपरिषदेचे बिगुल वाजल्यापासून अंबरनाथ शहराला राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण ढवळून निघाले होते.या वातावरणात गोळीबारसारख्या घटनाही घडल्या.
या निवडणूकीत दोन महत्त्वाच्या प्रभागात थेट काका-पुतण्यांमधे लढत होणार होती. अंबरनाथ पश्चिम भागात शिवसेनेचे शहराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचा पुत्र निखिल वाळेकर यांच्याविरोधात पुतण्या पवन वाळेकर भारतीय जनता पार्टीकडून उभे होते. तर अंबरनाथ पूर्व भागात उमेश गुंजाळ यांचा पुतण्या सचिन गुंजाळ भारतीय जनता पक्षातून उभा होता. या दोन लढतींकडे सगळ्या अंबरनाथ शहराचे लक्ष लागले होते. सचिन गुंजाळ आणि पवन वाळेकर दोघांनीही निवडणुक जाहिर होण्याआधी काही दिवसापूर्वीच शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. निवडणुकीचा निकाल आल्यावर दोन्ही पुतण्यांनी निवडणुकीत बाजी मारल्याचे चित्र अंबरनाथकरांना दिसले. निवडणुकीनंतर अंबरनाथमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक करत 12 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. ब्लॉक काँगेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह त्यांची पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांना 21,593 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि त्यांचा मुलगा सचिन पाटील यांचा समावेश आहे. दोघेही माजी नगरसेवक आहेत.
*भाजपाच्या रुचिता घोरपडे झाल्या नगराध्यक्षा*
बदलापूर नगरपालिकेच्या चुरशीच्या आणि अटीतटीच्या. झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रुचिता घोरपडे यांची निवड झाली. त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका विणा म्हात्रे यांचा पराभव केला.
रुचिता घोरपडे यांना 64,604 तर विणा म्हात्रे यांना 59,970 मते मिळाली. नगराध्यक्षा पदासह भाजपने २३जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेनेही २३ जागा मिळवल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागी विजय मिळवला आहे. बदलापूर हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता पण यंदा भाजपाने बालेकिल्ल्यावर धडक मारली आहे.
शहरप्रमुख वामन म्हात्रे, पत्नी विणा म्हात्रे आणि मुलगा वरुण म्हात्रे यांच्यासह बंधू तुकाराम म्हात्रे आणि भावजय उषा म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. तथापि विणा म्हात्रे आणि वरूण म्हात्रे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून स्वबळाचा नारा देऊन शिवसेना आणि भाजपाने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विकास कामावरून दोन्ही पक्षांमध्ये वादविवाद झाले होते. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुरात प्रचार सभा घेऊन पक्षाच्या उमेदवारांना प्रोत्साहन दिले होते. भाजपामुळेच बदलापूरचा विकास झाल्याचा दावा भाजपाने केला तसाच दावा शिवसेनेने केला होता. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिल्याने बदलापुरात विविध विकासकामे झाल्याचा दावा सेनेने केला होता.
बदलापुरात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली होती. शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली होती, शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली मात्र त्यांच्या पदरी अपयश पडले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस शहराध्यक्ष शिवसेनेत सामील झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.