उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना विश्वास
भाईंदर: आगामी मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मीरा रोड येथील शिवार गार्डनमध्ये आयोजित पदाधिकारी निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा-भाईंदरवर यंदा महायुतीचा भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्यास राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षांत मीरा-भाईंदरचा चेहरामोहरा बदलला आहे. हा विकास प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाला. आम्हाला सत्तेचा मोह नाही, तर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सांगून शिंदे यांनी सरनाईक यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
शिवसेना हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे अधोरेखित करत शिंदे यांनी, जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो, तोच पुढे जातो, असे स्पष्ट केले. सर्वांनी एकजुटीने काम करून महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निवडणूक समीकरणांबाबत बोलताना शिंदे यांनी मीरा-भाईंदरमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून, याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल, असे स्पष्ट केले. महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. युतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र कामाला लागा. ठाणे, मुंबईनंतर मीरा भाईंदरवर भगवा फडकवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, मीरा-भाईंदरची जनता हेच माझे कुटुंब आहे. गेल्या १५ वर्षांत जनतेच्या विश्वासातूनच मी काम करत आलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. आगामी निवडणुकीत ‘बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा’ महापालिकेवर फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन श्री.सरनाईक यांनी केले.