‘दृष्टि २०२५’ मध्ये के.पी.बक्षी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे: नागरी सेवा म्हणजे सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव होय. नागरी सेवकांनी समाजातील कोणत्याही घटकाबाबत पूर्वग्रह न बाळगता सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रभावी सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त के.पी.बक्षी यांनी केले.
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ६ व ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला भव्यदिव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ‘दृष्टि २०२५’ माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त के.पी.बक्षी यांनी नागरी सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
नागरी सेवा परीक्षेची रचना, तयारीची योग्य पद्धत, चालू घडामोडींचे महत्त्व तसेच प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्या याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देत प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टीकोन आणि पहिल्या दिवसापासून प्रभावी कामकाज करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात श्री. बक्षी यांनी विद्यार्थ्यांना नागरी सेवा (Civil Services) परीक्षेविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस, आयएफएस तसेच विविध केंद्रीय सेवा यांचा समावेश असून सुमारे २० सेवांमध्ये पदभरती या परीक्षेमार्फत केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, पूर्वपरीक्षा (Preliminary), लेखी परीक्षा (Written Examination) आणि मुलाखत (Interview) असे या परीक्षेचे स्वरूप असते.
नागरी सेवेत जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच सामान्य ज्ञान, निवडलेला विषय तसेच देश-विदेशातील घडामोडींचे (Current Affairs) सातत्याने वाचन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) आणि केंद्रीय पातळीवर यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) या परीक्षा महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठराविक वयोमर्यादेपर्यंत राज्य सेवा आणि केंद्रीय सेवांमध्ये पर्याय उपलब्ध असतात व स्वतःला सातत्याने सुधारण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक क्षेत्रात चांगले व वाईट, प्रामाणिक व भ्रष्ट घटक असतात; मात्र एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून कामाची अंमलबजावणी पहिल्या दिवसापासूनच प्रामाणिकपणे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तरुणांच्या विचारांना चालना देणारा आणि त्यांना करिअर, व्यक्तिमत्त्व विकास तसेच समाजकारणाच्या विविध क्षेत्रांबाबत मार्गदर्शन करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमास वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ.चंद्रशेखर वावीकर, डॉ.वैशाली वावीकर, डॉ.गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.