तिकीट न मिळाल्यास प्रामाणिकपणे काम करण्याचे इच्छुकांकडून लेखी वचन
ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला महायुतीत सर्वाधिक जागा मिळणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे पक्षाकडे उमेदवारीची मागणी करण्यासाठी फॉर्म घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीट मिळाली नाही तर बंडखोरी होऊ शकते या शक्यतेने शिंदे गटाने फॉर्म बरोबरच प्रतिज्ञापत्र देखील भरून घेतले आहे. यात तिकीट मिळाले नाही तर पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे इच्छुकांकडून लिहून घेण्यात येत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून बुधवारपासून सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असणार्या सर्व कागदपत्रांची यादी यासोबत देण्यात आली आहे. टेंभीनाका येथील आनंदाश्रमातही शिवसेना शिंदे गटाने अर्ज वितरणाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी साडे चारशेहून अधिक अर्ज इच्छूक घेऊन गेले. पण या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या घोषणापत्राने सर्वच चक्रावून गेले. मी शिवसेनेच्या तत्व आणि शिस्तीचे पालन करण्याची, पक्षहितासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करतो. तसेच पक्ष जो उमेदवार निश्चित करील, त्या उमेदवाराला पक्षआदेश मानून प्रामाणिकपणे निवडून आणण्यासाठी कटीबद्ध असेन, असे या घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे.
या घोषणापत्राने इच्छुकांची झोप उडाल्याची चर्चा आहे. माजी नगरसेवकांंनी पुन्हा उमेदवारीसाठी अर्ज घेतले आहेत. तर त्यांच्याच प्रभागांमध्ये संधी मिळावी यासाठी कार्यरत असेलेल्या इच्छुकांनीही अर्ज घेतले आहेत. इतर पक्षांतून उमेदवारीच्या आशेने आलेल्या पदाधिकार्यांचाही यामध्ये समावेश आहे. उमेदवारी मिळेल या आशेने गेली काही वर्षे प्रभागांमध्ये विविध उपक्रम राबवून त्यांनी मोठ्या प्रमाणात पदरमोड केली होती. पण महायुतीच्या चर्चेमुळे सर्वप्रथम विद्यमान आणि मर्जीतील दिग्गजांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नगरसेवक बनण्याच्या स्वप्नांवर यावेळीही पाणी फेरले जाणार का ही चिंता त्यांना सतावत आहे.
वास्तविक ठाण्यात शिवसेना शिंदे गटाने २०१७ प्रमाणे स्वबळाची तयारी केली होती. ठाण्यात ताकद वाढावी यासाठी भाजपच्या प्रभागांमध्येही इच्छुकांना बळ देण्यात आले होते. त्यानुसार नौपाडा, मानपाडा, घोडबंदर पट्ट्यात इच्छुक कामाला लागले होते. पण पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर सर्वाधिक बंडखोरी शिवसेना शिंदे गटात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.