वाहनांवरील ई चलानचा बोजा घटला

लोक अदालतीत ११,८२० खटले निकाली
* एक कोटी ३२ लाखांचा थकित दंड जमा
ठाणे: वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन अनेक प्रकारचे ई चलान दंड प्रलंबित ठेवणाऱ्या वाहन चालकांचा ठाणे शहर वाहतुक शाखेच्या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.
शनिवारी पार पडलेल्या या लोक अदालतीत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील एकुण ११,८२० खटले निकाली निघाले असून तब्बल एक कोटी ३२ लाख ७०,२०० इतका दंड न्यायालयात जमा करण्यात आल्याने ई चलान वरील बोजा बऱ्याच अंशी कमी झाला आहे.
वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड न भरणाऱ्या वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र पाजनकर यांच्या पुढाकाराने शनिवार १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने ५ डिसेंबरपर्यंत थकीत दंड सवलतीत भरणा करण्यासाठी ठाणे शहर वाहतुक विभागाने केलेल्या आवाहनाला वाहनचालकांनी उदंड प्रतिसाद दिला. या कालावधीत एकुण ११,७४४ खटले वाहतुक शाखेने निकाली काढले असून चालकांनी एकुण एक कोटी ३१ लाख ९९,९५० इतका थकीत दंड जमा केला. तर, शनिवारी ८३ थकीत ई चलन प्रकरणात ७०,२५० रुपये इतका दंड तत्काळ भरणा करण्यात आला. असा एकुण एक कोटी ३२ लाख ७०,२०० रुपये दंड न्यायालयामध्ये ऑनलाईन भरणा करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेकडून देण्यात आली.