उपमुख्यमंत्री शिंदे, रविंद्र चव्हाण उद्घाटनाला एकत्र
कल्याण: कल्याण-डोंबिवलीत विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी झाले. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. मागील काही दिवस पक्षांतर आणि पक्षप्रवेश यामुळे शिवसेना-भाजपत मोठा तणाव पाहायला मिळत होता. मात्र दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र दिसल्याने त्यांच्यातील विस्तव विझल्याची चर्चा सुरू झाली आहे.
डाेंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात देशातील पहिले व्हर्टीकल स्पोर्ट संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इन डोअर आऊट डोअर इमारतीचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नुतनीकरणाचे काम याचे भूमीपूजन तसेच प्रेरणा वॉर मेमोरियल या स्मारकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश माेरे, सुलभा गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख गाेपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, पद्मश्री गजानन माने आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कडोंमपा निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशावरुन महायुतीतील या दोन्ही पक्षात वादंग सुरु झाला होता. त्यामुळे भूमीपूजन आणि लोकार्पण साेहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार की नाही या विषयी तर्क-वितर्क व्यक्त केले जात होते. मात्र त्यांनी या वादावर पडदा पडल्याचे कालच स्पष्ट केल्याने त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. २०१४ पूर्वी एमएमआरडीएकडून कल्याण-डोंबिवलीला निधी मिळत नव्हता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आवाज उठविल्याची आठवण सांगत २०१४ सालानंतर कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला एमएमआरडीएकडून निधी मिळू लागल्याची बाब रवींद्र चव्हाण यांनी नमूद केली.
यावेळी बोलताना श्री.शिंदे म्हणाले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे स्वतंत्र धरण असावे याकरिता काळू धरण उभारण्यासाठी मुख्यमंत्री असताना चालना दिली व त्यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या प्रस्तावित धरणाच्या कामाला चालना देण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच पालिका क्षेत्रातील नागरीकांची पाणीटंचाई समस्या कायमची सुटण्यासाठी पाण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे येत्या काहीच वर्षात कल्याण डोंबिवलीकरासाठी स्वतंत्र धरणाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात केले .
विकास कामांचा पाठपुरावा आणि त्यासाठी निधी मंजूर करण्यात खासदार शिंदे यांचे कौतूक करताना खासदार शिंदे यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. ते रिझन देत नाहीत. त्यामुळे ऑन दी स्पॉट डिसिजन आहे. ही कामाची पद्धत चांगली आहे.
२०१४ सालापूर्वी कल्याण मतदार संघातील विकास कामे आणि त्यानंतर झालेला विकास यात जमीन आस्मानचा फरक आहे. विकास काम करताना अनेकांनी अडथळे निर्माण केले, टीका केली. खड्डे खोदण्याचे प्रयत्न केले. तेच खड्ड्यात गेले अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणाचा विकास झाला नसता असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. त्याचबरोबर खासदार शिंदे यांनी पंतप्रधान कार्यालयापासून सगळ्याच खात्यातून विकास कामाकरीता निधी आणला आहे. त्यामुळे त्यांच्या हातून त्यांच्या मतदार संघात विकासाची भरीव कामे उभी राहिली आहे. डोंबिवलीत उभारण्यात आलेले प्रेरणा वॉर मेमोरियल रत्नागिरीत ही उभारणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.