न कर्त्याचा वार शनिवार; पौष महिना अशुभ नाही

गैरसमजुतीवर सोमण यांचा प्रहार
ठाणे: यावर्षी २१ डिसेंबर २०२५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान पौष महिना आलेला आहे. हा महिना अशुभ असल्याची गैरसमजूत समाजात आहे. मात्र हा महिना अशुभ नसून शुभ कार्यासाठी चांगला असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.
पौष महिना शुभ कार्याला वाईट असतो अशी चुकीची समजूत काही लोकांची झालेली असते.  पौष महिना हा शुभ कार्याला वाईट नसतो. पौष महिन्यात मकर संक्रांती येत असल्यामुळे हा गैरसमज झालेला असावा. आपल्याकडे अशा काही गोष्टीत गैरसमजुती चालत आलेल्या आहेत. ‘संक्रांत आली’ हा शब्द प्रयोगही चुकीच्या अर्थाने वापरला जातो. एखादी वाईट गोष्ट घडली तर ‘संक्रात आली’ असे म्हटले जाते, पण हा शब्दप्रयोग चुकीचाच आहे, असे श्री.सोमण यांनी स्पष्ट केले.
सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला ‘मकर संक्रांती’ म्हटले जाते. सायन मकर संक्रांतीपासून म्हणजे २१ डिसेंबर २०२५ पासून दिनमान मोठे होऊ लागते. दिनमान मोठे होणे हे वाईट कसे असू शकेल ? उलट ही एक चांगली गाणी आनंदाची गोष्ट आहे. प्राचीन काळी विजेचे दिवे नव्हते. त्यावेळी दिनमान मोठे होत गेल्याने अधिक वेळ कामे करता येतात म्हणून मकर संक्रांती हा गोड सण मानला जात होता. मध्यंतरीच्या काळात मकर संक्रांतीच्यासंबंधी भीती दाखवली गेली असावी !  त्यामुळे पौष महिन्यासंबंधीही भीती वाटू लागली असावी. अर्थात ही भीती चुकीची आहे. पौष महिना आणि दिनमान वाढत जाणे या दोन्हीही गोष्टी चांगल्या आहेत. शुभ आहेत. त्यामुळे पौष महिन्यामध्ये शुभ कामे करण्यास हरकत नाही, असेही सोमण म्हणाले.
दक्षिण दिशा अशुभ असते, अमावास्या वाईट असते, भाद्रपद कृष्ण पक्ष-पितृपक्ष वाईट असतो, चंद्र-सूर्य ग्रहणे अशुभ असतात इत्यादी गैरसमजही समाजात पसरलेले दिसतात. या सर्व चुकीच्या समजुती आहेत. आपण वैज्ञानिक युगात वावरताना यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेणे गरजेचे आहे. सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेस मावळतो. म्हणून पूर्व-पश्चिम दिशांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे, पण म्हणून उत्तर-दक्षिण दिशा वाईट कशा असू शकतील? असा प्रश्नही सोमण यांनी उपस्थित केला आहे.
फक्त श्रीमंत-सुखी लोकांच्या घराचे दरवाजे पूर्व-पश्चिमेला आहेत आणि गरीब-दु:खी लोकांच्या घराचे दरवाजे दक्षिण-उत्तरेला आहेत का? श्रीमंती-गरीबी किंवा सुख-दु:ख हे घराच्या दरवाजावर अवलंबून नसते तर ते त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अमावास्या जर वाईट असती तर लक्ष्मीपूजन अमावास्येच्याच दिवशी का केले असते? अमावास्येच्या दिवशी सारे जग सुरळीत चालत असतेच ना?
पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीतलावर येतात अशी श्रद्धा असते. मग पितृपक्ष अशुभ कसा असेल? उलट आपले पूर्वज पृथ्वीतलावर आपणांस आशीर्वाद देण्यासाठी येत असतात ही तर खूप आनंदाची गोष्ट नाही कां? पितृपक्ष हा अजिबात वाईट नसतो. उलट या काळात केलेल्या आपल्या कामास आपल्या पितरांच्या शुभेच्छाच असतात. सूर्य-चंद्र ग्रहणे हे निसर्गातील अविष्कार असतात. ते वाईट कसे असतील? असे विचारत सोमण यांनी वैज्ञानिक दृष्टीने याकडे पाहण्याचा सल्ला दिला. शनिवार हा शनीचा असल्याने वाईट अशीही काही लोकांची गैरसमजूत असते. “न कर्त्याचा वार शनिवार ! “असं म्हणतात ते अगदी खरे आहे, अशी मिश्किल टिप्पणीही सोमण यांनी शेवटी केली.